जगभरात सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांती पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.इराणमध्ये महिला अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात नर्गिस मोहम्मदी यांचे मोलाचे योगदान आहे.
नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा उभारला. मानवी हक्क आणि महिला स्वातंत्र्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या लढ्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नर्गिस मोहम्मदी यांना मानवी हक्कांविरोधात लढा देताना कार्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास देखील भोगावा लागला आहे.. सध्या, त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. गेल्या 30 वर्षात नर्गिस मोहम्मदी यांना त्यांचे लेखन आणि अन्यायाविरोधात हालचालींबद्दल सरकारने अनेकदा शिक्षा केली आहे.सरकारकडून मोहम्मदींना पाच वेळा दोषी ठरवण्यात आले आहे आणि 13 वेळा अटक करण्यात आली आहे.
विरोधकांचा, कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी इराण सरकार मृत्यूदंडाचा गैरवापर करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे . काही दिवसांपूर्वीइराणमध्ये हिजाब घालण्यास विरोध केलेल्या तरुणीचा पोलिसांनी केलेल्या अत्याचारात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर हिजाब विरोधी आंदोलनात इराणमधील महिलाच नाही तर पुरुषांनी पण मोठे आंदोलन केले होते. नर्गिस यांनी ही मृत्यूदंडाची शिक्षा संपविण्याचे आवाहन केले आहे.