जगातील कोणता देश मोठा आहे, याचे मूल्यांकन त्या देशातील “सुखांक”(हॅप्पीनेस इंडेक्स) बघून निश्चित करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने ठरविले आहे; आपल्या देशातील संस्कृती आणि परंपरांमुळे भारत देश यामध्ये नक्कीच अव्वल स्थानावर आहे; ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय नागरिक हे आपल्या देशाचे ‘ब्रँड अँम्बेसिडर’ म्हणून काम करत आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.
लंडन येथील बांबू हाऊस येथे भारतीय नागरिकांच्या स्थानिक संघटनांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. ब्रिटनचे खासदार वीरेंद्र शर्मा, कुलदीप शेखावत, सुरेश मंगलगिरी, कृष्णा पुजारा यांची यावेळी उपस्थिती होती.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ‘जियो और जिने दो’ या भावनेतून “वसुधैव कुटुंबकम्”चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश आपल्या माध्यमातून सर्वत्र पोहोचेल, असा मला विश्वास आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती जगाने स्वीकारायला सुरुवात केली आहे. आपण त्याला बळ देण्यासाठी खारीचा वाटा उचलावा.
ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक भारताच्या संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधी आहेत; भारताची विचारधारा तुमच्यामुळे सर्वत्र पोहोचेल व यामुळे भारताचा सन्मान वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला लंडन येथील मराठी, गुजराती व इतर भारतीय बांधव उपस्थित होते.