गेल्या काही दिवसांपासून नांदेडच्या विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू सत्र चालू आहे. गेल्या ७ दिवसात ८३ मृत्यूची नोंद झाली असून आता पुन्हा गेल्या २४ तासात अजून १५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.यात ६ अर्भक, २ बालकांचा समावेश आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
शासकीय रुग्णालयात औषधी पुरवठा करणाऱ्या हाफकीनने औषधी खरेदी बंद केली आहे. यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दरम्यान अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याची माहिती देण्यात आली होती.
दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.