डाकिया डाक लाया डाक लाया….
चिठ्ठी आई है ,आई है
चिठ्ठी आई है….
संदेसे आते है …..के घर कब आओंगे ….
या गाण्यातून येणाऱ्या पत्रा विषयीची ओढ स्पष्ट दिसते.
आजही पत्र या विषयाची तितक्याच आतुरतेने वाट बघितली जाते.
पूर्वी पोस्टमन काका पत्र घेऊन येणार म्हणून अधिकच उत्सुकतेने लोकं वाट बघायचे…
आपल्या आप्तेष्टांची विचारपूस करण्याकरीता पोस्ट हे एकमात्र माध्यम होते.
बाहेर शिकणारे विद्यार्थी किंवा कुटुंब, मनीऑर्डरची वाट बघायचे. तार आली की मात्र काळजी वाटायची.
सुख दुःखाचे क्षण असो की सीमेवर लढणारा सैनिक असो त्यांना उमेद देणारा एकमात्र सखा होता टपाल !!
आज इ मेल, इंस्टा, ट्विटर,फेसबुक आणि बरेच काही ….. असे असले तरी पत्राच्या भावना त्यात व्यक्त करता येत नाहीत.
भावनांच्या बटबटीत प्रदर्शनात ह्या ह्रदयीचे त्या हृदयी पोहोचवणारे पत्र काहीसे हरवून गेले आहे, असे वाटत राहते. आणि म्हणूनच पत्राची आतुरतेने वाट बघितली जाते.
दरवर्षी ९ ऑक्टोबर हा विश्व टपाल दिवस Universal Postal Union (UPU) द्वारे साजरा केला जातो.
विश्व टपाल दिवस साजरा करण्याचा उद्देश्य ग्राहकांना डाक विभागाच्या विविध सुविधा आणि सेवाविषयी माहिती देणे, त्यांना जागरूक करणे, डाकघरांमध्ये सामंजस्य निर्माण करणे हा आहे.
टपाल विभागाने जगात एका ठिकाणी राहणाऱ्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांशी जोडण्याचे मोठे माध्यम उपलब्ध करून दिले. आंतरराष्ट्रीय पत्रांचा संपूर्ण जगात मुक्त प्रवास प्रशस्त केला.
UPU ची सदस्यता घेणारा भारत हा पहिला एशियाई देश आहे. भारतात ही सेवा १ ऑक्टोबर १८५४ ला सुरू झाली.
टपाल सेवेमुळे अनेकांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या या सेवांमुळे सामाजिक आणि आर्थिक विकासालाही हातभार लागला.
टपाल विभागातर्फे विविध पायाभूत सेवा, त्याचबरोबर बँकिंग वित्तीयसेवा, बिमासेवा, सबसिडी दरांमध्ये उपलब्ध करून देत आहे.
९ ते १४ ऑक्टोबर विश्व टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
१० ऑक्टोबर – सेविंग बँक डे,
११ ऑक्टोबर – मेल दिवस,
१२ ऑक्टोबर – डाक टिकट संग्रह दिन,
१३ ऑक्टोबर – व्यापार दिवस,
१४ ऑक्टोबर – विमा दिवस
असे त्याचे स्वरूप आहे.
तंत्रज्ञान, इंटरनेटचे वर्चस्व असणाऱ्या युगात , १२० वर्षांपासून सुरू झालेली टपाल व्यवस्था संपुष्टात येईल असे भाकीत केले गेले होते.
इंटरनेटमुळे संवादाची परिभाषा बदलली पण टपाल व्यवस्था मात्र संपली नाही.
या ई – युगात आजही पोस्टाचे महत्त्व कायम आहे.
अर्थात व्यावसायिक स्पर्धेच्या युगात टिकून राहणे हे टपाल व्यवस्थेपुढे मोठे आव्हान आहे.
जगात ई-कॉमर्स कंपन्यांची कुरिअर पार्सल सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. डिजिटायझेशनमुळे लोक आपली वस्तू पाठवण्यासाठी नवनवीन माध्यमांचा विचार करत आहेत.
परंतु या सगळ्या आधुनिक माध्यमातून अनेकवेळा आर्थिक फसवेगिरीला सामोरे जावे लागते.
टपाल ही मात्र विश्वसनीय सेवा आहे लोकांचा आजही या सेवेवर विश्वास आहे.त्यामुळेच आजही टपाल सेवेचे महत्त्व आहे.
बदलत्या युगाप्रमाणे पोस्टानेही नवे स्वरूप धारण केले आहे.
आज संपूर्ण विश्व , ‘टपाल दिवस’ साजरा करत आहे.
टपाल विभागाचा अविरत चाललेला हा प्रवास पुढेही नवनवीन योजना आणि सेवांबरोबर अखंड चलो या सदिच्छा.
सौ. दिपाली नितीन कुलकर्णी
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र