मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर
बहिणा बाईंचे हे शब्द मनाचं अगदी यथायोग्य वर्णन करतात.
मन हे एक अजब रसायन आहे. ते दाखवता येत नाही पण तरी ते हृदयात असल्याचं आपण मानतो
खरं म्हणजे जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असं म्हणता येईल. आणि या सगळ्या तर मेंदूद्वारे होणाऱ्या प्रक्रिया आहेत.
प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये व तत्त्वज्ञानामध्ये मनाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
अतिशय गुंतागुंतिच्या या मनोव्यापाराला अनेक कंगोरे आहेत.
अशा या अद्भुत मनाचा आपल्या तनावर म्हणजेच शरीरावर आणि विचारशक्तीवर अधिकार चालतो हे मात्र खरं
त्या मनाला स्थिर ठेवण्यासाठी योग्य मार्गावर ठेवण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले.
१० ऑक्टोबर हा मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
गेल्या काही वर्षात बदलत्या जीवनशैली मुळे आपलं शरीर हे शारीरिक आणि मानसिक व्याधींचे माहेरघर बनले आहे.
याचं कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असलेली ताणतणाव पूर्ण व्यवधाने
आणि मुख्य म्हणजे मन मोकळं करायला आवश्यक अवकाश आणि व्यक्तींची कमतरता …
आजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जीवन जगणे तसे अवघड काम आहे. म्हणूनच शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे.
मानसिक आजार टाळण्यासाठी तणावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
तणाव घेतल्याने समस्या सुटणार नाहीच, पण त्याचा आरोग्यावर मात्र वाईट परिणाम होतो
हे कळतं पण वळत नाही हेच. खरं
त्यासाठी या गोष्टी करून पाहू या का
एकटे रहाणे टाळू या
नकारात्मक लोकांपासून दूर राहू या
चांगले मित्र मिळवू आणि टिकवू या
दिवसात थोडा वेळ योग आणि ध्यानाला देऊया
संतुलित आहार घेऊया
मनाला आनंद देणार्या गोष्टी करुया
म्हणजेच स्वतः ला थोडा वेळ देऊया स्वतः वर प्रेम करू या
जो स्वतः वर विश्वास ठेवतो, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत ठाम रहातो,तोच योग्य निर्णय घेऊन समाधानी आयुष्य जगू शकतो.
स्व – प्रेम केल्याने ताजे, टवटवीत प्रफुल्लित मनाचा आनंद घेता येईल
संत रोहिदास म्हणतात ना
‘मन चंगा तो काठोती मे गंगा’
रुपाली अमृतकर, कोपरगाव
सौजन्य – समिति संवाद ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत