चंडिकादास अमृतराव देशमुख ऊर्फ नानाजी देशमुख यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी झाला.
नानाजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक. लहानपणी भाजी विकून पैसे मिळवून शिक्षण पूर्ण करणारे नानाजी संघसंस्थापक पु.डॉ. हेडगेवार यांच्या संपर्कात आले व संघाशी कायमचे जोडले गेले. पुढे काही वर्षे त्यांनी देशाच्या राजकारणात प्रमुख भूमिका निभावली.
प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नंतर उत्तर प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या नानाजींनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चारित्र्याच्या आधारावर एक नवीन राजकीय पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच जनसंघाची स्थापना झाली.
मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांद्वारे आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर त्यांनी मुख्य लक्ष केंद्रित केले. पाणी अडवा – पाणी जिरवा या योजनेतून सिंचनक्षेत्रात वाढ, गोवंशसंवर्धन, पारंपरिक कृषी पद्धतींचा विकास व प्रसार, गुरुकुल पद्धतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या मार्गाने स्वयंरोजगाराला प्राधान्य, आरोग्यधाम योजनेअंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन व याच पद्धतीचे अनेक प्रकल्प चित्रकूट परिसरात कार्यान्वित केले.
येथेच नानाजींनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन केले. हे प्रकल्प सक्षमतेने चालवण्यासाठी त्यांनी समाजसेवेची इच्छा असणाऱ्या दांपत्यांना समाजशिल्पी बनवले.
चित्रकूट हे त्यांची कर्मभुमी होती. आरोग्यधाम व गोशाळा उद्यमिता विद्यापीठ, ग्रामोद्योग विद्यालय, आश्रमशाळा गुरुकुल, ग्रंथालय, मातृसदन, दंतचिकित्सा केंद्र इत्यादी त्यांनी तेथे उभारले.
ग्रामीण लोकांचे जीवनमान उंचावण्यास व त्यांना स्वावलंबी बनविण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांनी सुमारे इ.स. १९९० चे दरम्यान मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील प्रत्येकी सुमारे २५० गावे दत्तक घेतली व त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. शिक्षण, स्त्रियांना गृहोद्योग, स्वच्छता, शुद्ध बोलणे इत्यादी शिकविण्यास त्यांनी कार्यकर्त्यांचा एक चमू उभारून ग्रामविकासाचे काम चालवले.
नानाजींच्या याच कामाचे फलित म्हणजे चित्रकूट क्षेत्रातील ८० खेड्यांमधील कोर्टामध्ये चालू असलेले जवळजवळ ६० टक्के खटले लोकांनी मागे घेतले व एकत्र बसून त्यावर निर्णय घेतले. चित्रकूटबरोबरच भारतातील इतर राज्यांमधील सर्वात मागास जिल्हे निवडून त्या ठिकाणी दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून काम सुरू आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील होमरी येथे प्रकल्प कार्यरत आहे. सोनदरा गुरुकुल, कृषिविकास, आरोग्य शिक्षण, योगाभ्यास, कलांचे शिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे येथे काम चालते.
त्यांच्या याच कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना आधी पद्मविभूषण आणि नंतर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. १९९७ मधे पुणे विद्यापीठाने त्यांना ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान केली.
आणीबाणीनंतरच्या काळात (इ.स. १९७७) नानाजी काही काळ लोकसभेचे सदस्य होते. इ.स. १९९९ मध्ये त्यांची राज्यसभेवरही निवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब बहाल केला.२०१९ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रॠषी,आदर्श समाजसेवी ,राजनेता,ग्रामविकास व अंत्योदयाचे धुरीणी कै.श्री.नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
– आप्पासाहेब पारधे
सौजन्य – विश्व संवाद केंद्र, देवगिरी