” नमस्ते सदा वत्सले मातृभूमे “ अशी प्रार्थना ध्वनी लाखो संघ स्वयंसेवकाच्या मुखातून नित्य नियमाने उमटत असताना राष्ट्राला ” परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं ” चा निर्धार व्यक्त केला जातो. या रा. स्व. संघ प्रार्थनेचे प्रार्थनाकर संस्कृत पंडित नरहरी नारायण भिडे यांचा आज स्मृतिदिन.
नरहरी नारायण भिडे यांचा जन्म नागपूर शहरातील. वडील पोलिस खात्यात अधिकारी. परंतु लाचारी किंवा लांगुनचालन करण्याचा स्वभाव नसल्याने ते बढतीविना खडतर आर्थिक आयुष्य जगत होते.नरहरि भिडे यांचे बालपण त्यांच्या आजोबांच्या सान्निध्यात व देखरेखीखाली गेले. वयाच्या १२ व्या वर्षी खेळताना अपघात होऊन उजवा डोळा निकामी झाला. तरी सुद्धा हार न मानता आर्थिक ओढग्रस्त स्थिती असताना, चिमणीच्या अंधुक प्रकाशात त्यांनी अभ्यास करून B. Sc . पदवी मिळवली. B. Sc . पदवी नंतर संस्कृत विषय घेऊन एम. ए . झाले. त्यांना बहुभाषाविद म्हणावे लागेल. जर्मन भाषेतील हायर डिप्लोमा , फ्रेंच भाषेचा लोअर डिप्लोमा. , राष्ट्र भाषा प्रवीण म्हणून त्यांनी आपल्या लिखाणातून त्यांचे ठिकाणी असलेल्या प्रज्ञेचा प्रत्यय करून दिला.
१९५६ साली वडिलांच्या निधनानंतर आई व बहीण पुण्यास आल्यामुळे भिडे नागपूर शहर सोडून पुण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल , टिळक रोड शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी च्या कोणत्याही विद्यार्थ्याला १९५६ पूर्वी सोळा वर्षात सन्मानाची शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. श्री भिडे यांनी आपल्या १३-१४ वर्षाच्या सेवा काळात ५ विद्यार्थी जगन्नाथ शंकरशेट व ४ विद्यार्थी बिडकर शिष्यवृत्ती मिळवून उत्तीर्ण झाले.
प्रतिवर्षी ११ वीची परीक्षा झाल्यानंतर भिडे सर विद्यार्थ्यांना घेऊन आळंदीस श्री महाराजांचे दर्शनास घेऊन जात. व विद्यार्थ्यांना तीन शपथ घेण्यास सांगत. १. धूम्रपान, २. मद्यपान ३. मांसाहार करणार नाही. आणि कोणतीही शपथ भविष्यात मोडल्यास माझ्याशी संबंध तुटेल.
अभ्यासातील यशाबरोबरच भिडे यांचा वयाच्या १५ वर्षी ( १९२८ मध्ये ) नागपूरच्या मोहिते शाखेशी स्वयंसेवक म्हणून संबंध आला. भिडे यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि प्रावीण्य या विषयी डॉ हेडगेवार यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळेच संघ स्थापनेपासून १९३९ पर्यंत हिंदी व मराठी देशभर ज्ञात असलेल्या संस्कृत भाषेत ऑनकृत करण्याची जबाबदारी भिडे यांच्यावर आली. सिंदी येथे झालेल्या बैठकीत सकाळी ११ वाजता भिडे यांना प्रार्थनेचा मसुदा आणून दिला.
त्याच आधारावर ‘ मेघनिर्घोश ‘ वृत्तात ‘ नमस्ते सदावत्सले मातृभूमे … ‘ ही सर्वांगसुंदर संघ प्रार्थना त्यांनी निर्माण करून अद्वितीय, अविस्मरणीय , अनुपमेय कार्य केले. अत्यंत आशयघन, प्रसादपूर्ण, आणि अभिजात संस्कृत वाटावी अशी हि त्यांची सरस श्रुतिमनोहर काव्य रचना झाली. तेव्हा पासून संघस्थानावर हीच प्रार्थना ‘ प्रणाम स्थितीत ‘ म्हटली जाते.
ही संघ प्रार्थना १ मे,१९४० पासून संघ स्थानावर म्हटली जाऊ लागली. ही केवळ प्रार्थना राहिली नाही तर प्रार्थनेला एक वेद मंत्र सामर्थ्यच प्राप्त झालेले आहे. स्वतः: पूर्ण प्रसिद्धीपासून दूर राहून विचार सौंदर्याचे एक लेणे रा. स्व . संघाला प्रदान केलेले भिडे गुरुजी १२ ऑक्टोबर, १९९२ रोजी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी विलीन झाले.
संस्कृत पंडित नरहरी नारायण भिडे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.