“असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे”
या शब्दाबरहुकुम असंख्य कविता, आणि गाण्यातून मराठी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान कायम ठेवून असलेल्या महाराष्ट्र कन्या ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके !
मराठी साहित्य जगतात अलौकिक प्रतिभेचा ठसा उमटवणाऱ्या पुण्यातल्या इंदापूरच्या शांताबाईंचे सुरूवातीचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा या सुप्रसिद्ध शाळेत झालं . त्यांनतर मराठी आणि संस्कृतमध्ये एमए करून तत्कालिन बॉम्बे विद्यापीठात प्रथम स्थान पटकावणाऱ्या शांताबाईंना न. चि. केळकर आणि चिपळूणकर पुरस्कराने सन्मानित केलं गेलं.
आचार्य अत्र्यांच्या नवयुग साप्ताहिकात सहाय्यक संपादक म्हणून ५ वर्षे काम करून नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून काम करण्यासाठी त्या नागपूरला गेल्या.
कविता, ललित लेखन, कथा संग्रह, कादंबरी-लेखन, मराठी भाषांतर, अश्या अनेक क्षेत्रात लीलया वावरणाऱ्या आणि सहज ओघवत्या शैलीनं आपला एक चाहता वर्ग तयार करणाऱ्या शांता शेळके यांनी आपल्या लिखाणाचं हिरवेपण आणि त्यातला गारवा कायम रसिकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचवला.
रसिकाच्या मनाला भावणारी भक्तीगीतं , बालगीतं , विरहगीतं , प्रेमगीतं,चित्रपट गीतं..देशभक्ती वर रचना.. शांताबाईंनी लिहिल्या असून त्यांचं बालसाहित्य सुद्धा फार आवडीनं वाचलं जातं. ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध कविता त्यांनी बालकांसाठी लिहिल्या
विशेष म्हणजे त्यांनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावानं लिखाण केलं आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांचे पहिले आणि खरे प्रेम राहिले ते कवितेवरच होते.
जवळपास शंभर पुस्तके प्रकाशित झालेल्या शांताबाईंचा वर्षा हा पहिला काव्यसंग्रह. तर ‘धूळपाटी ‘ हे त्यांचं आत्मचरित्र !
“माझिया शब्दांवरी माझा ठसा माझा ठसा
हे शब्द माझे चेहरे अन् हे शब्द माझा आरसा ..”
असं म्हणणाऱ्या या शांताबाईंचा ठसा त्यांच्या सर्वच लेखनप्रकारांवर उमटलेला दिसून येतो .
आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता त्या निमित्त त्यांच्या साहित्य प्रतिभेला मानाचा मुजरा
शैलजा भालेराव, कोपरगाव
सौजन्य – समिति संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत