भारत-पाकिस्तान सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे. कारण केवळ हे दोन देशच नाही, तर जगभरातील देशांचे लक्ष या सामन्यावर असते. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता भारताचा सामना आज शेजारी देश पाकिस्तान संघाशी होणार आहे.
खरे तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची नेहमीच प्रतीक्षा असते.पण जेव्हा विश्वचषक येतो तेव्हा सामना अधिक रोमांचक होतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहचले आहे. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. भारतीय संघाला आपला वेग कायम राखायचा आहे, तर बाबर आझमच्या संघालाही भारताविरुद्ध विजयाची आशा असेल. या सामन्याचे आयोजन हे जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.
वन डे वर्ल्ड कपचा रेकॉर्ड पाहिला तर आतापर्यंत भारत-पाक सातवेळा एकमेकांना भिडले आहेत. यापैकी भारतीय संघाने सातपैकी सात सामने जिंकलेत. आता रोहित अँड टीम आठवा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
आजच्या ह्या हायव्होल्टेज सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर पाकिस्तान संघाची जबाबदारी बाबर आझमच्या खांद्यावर असेल. भारत आणि पाकिस्तानने आपापल्या पहिल्या दोन सामन्यात जोरदार विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत दोन्ही संघांचे खेळाडू आत्मविश्वासाने आणि पूर्ण ताकदीने हा सामना जिंकायचा प्रयत्न करतील.