विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग आठव्यांदा आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले आहे. या विजयासह भारतीय संंघाने गुणतालिकेमध्ये नंबर वन स्थानाकडे भरारी घेतली आहे.तसेच याचबरोबर भारताचा रनरेटही भक्कम झाला आहे
भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचे सर्व गडी बाद करत पाकिस्तानला अवघ्या १९१ धावांवर रोखले होते. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने सलग तीन विजय पूर्ण केले. तसेच पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील आपली विजयाची परंपरा कायम राखली.
सलामीवीर शुबमन गिल फार काही चमक दाखवू शकला नाही. शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर २६ धावांवर तो बाद झाला. तर रोहितने 63 बॉलमध्ये 86 धावा केल्या, यामध्ये त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. मात्र रोहित शर्मा अर्थात हिटमॅनचे आज शतक हुकले याची खंत सर्व चाहत्यांच्या मनात राहिली . रोहित शर्मा याने विजयाचा पाया रचल्यावर के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी विजयी भागीदारी केली. श्रेयसनेही आपले अर्धशतक पूर्ण करत विजयी चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले