लक्ष्मीताई म्हणजे बहुआयामी कार्यकर्त्या
पुण्यातील सी-डॅक सारख्या ख्यातनाम संशोधन संस्थेत काम करत असलेल्या सौ. लक्ष्मीताई संदीप पानट यांचं सामाजिक कार्यही प्रेरणा देणारं आहे. मुख्यत्वे तीन ते आठ या वयोगटातील मुलांसाठी बालगोकुलम् हा जो उपक्रम चालतो, त्यातही त्या सक्रिय आहेत.
सौ. लक्ष्मीताई पानट मूळच्या ओरिसातील. त्यांचं सगळं शिक्षणही तिकडेच झालं. त्यामुळे ताईंना उडिया भाषा अवगत आहे. त्यांनी ओरिसातील राउरकेला येथील नॅशनल इन्स्टिट्युट अॉफ टेक्नॉलॉजी मधून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. टाटा टेक्नॉलॉजीज, पर्सिस्टंट सिस्टिम येथील कामाचाही त्यांना अनुभव आहे. त्या सी-डॅक (सेंटर फॉर डेव्हलपमेंट अॉफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) येथे सिनियर डायरेक्टर म्हणून गेल्या १५-१६ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील एकूण प्रवास आता २८ वर्षांचा आहे. बालपणापासून त्या राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरांमध्ये सहभागी होत असत. उडिया आणि बंगाली मैत्रिणींमध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. त्यांच्या आई वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत असत. त्यामुळे सामाजिक कामाचं बाळकडू त्यांना घरीच म्हणजे आईकडूनच मिळालं आहे.
श्री. संदीप पानट ह्यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या पुण्यात वास्तव्यास आल्या. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि अॉटोमोबाईल सॉफ्टवेअर या क्षेत्रातील कामाचा त्यांचा मोठा अनुभव आहे. आपल्याला उपयोगी पडतील असे काही बनवावे म्हणुन त्यांनी सी-डॅकमध्ये काम करण्याचं ठरवलं. सुपर कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन प्लॅटफॉर्मवर हेल्थ इन्फर्मेटिक असे एक डोमेन आहे. या विषयात काम करण्याची लक्ष्मीताईंना अधिक आवड आहे. संगणकाच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्या जशा आवडीनं काम करत आहेत, तशाच त्या शास्त्रीय संगीताचे शिक्षणही घेत आहेत. त्यांनी संगीत विशारद ही पदवी संपादन केली आहे आणि आता संगीत अलंकाराचं शिक्षण त्या सौ. मोहिनीताई सहस्रबुध्दे ह्यांच्याकडे घेत आहेत. त्यातून पुढे त्यांना राष्ट्र सेविका समितीची देशभक्तीपर गीतं म्हणू शकणारा महिलांचा गट तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.
हे काम सुरू असतानाच दरवर्षी एप्रिल महिन्यात समितीच्या एका आयामा अंतर्गत त्या महिला गृह उद्योगाचं साहित्य घरपोच करण्याच्या कामातही उत्साहानं सहभागी होतात.
बालसंस्कार या विषयातही लक्ष्मीताई सक्रिय आहेत. ‘बालगोकुलम’च्या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. पाठांतराचे मंत्र, सुभाषितं, देशभक्तीपर गीतं, संत कबिरांचे दोहे, कृतीद्वारे रामरक्षा म्हणणं अशा वेगवेगळ्या गोष्टी या संस्कार वर्गात शिकवल्या जातात. या वर्गात ३ ते ८ वयोगटातील मुलांचा सहभाग असतो. छोट्या छोट्या गोष्टींच्या रूपातून रामायण, महाभारत सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आता ह्या कामात त्यांना मैत्रिणींचीही मदत होते. सोसायटी मधील गणपती उत्सवात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत टीव्हीमध्ये दिसणाऱ्या आधुनिक पात्रांचं अनुकरण न करता आपल्या संस्कृतीचं दर्शन घडेल, अशी व्यक्तिमत्व आवर्जून निवडली जातात. झाशीच्या राणीची वेशभूषा जी करते, ती तिला शिकवलेली कविता खणखणीत आवाजात म्हणते. ‘आओ बच्चो’ या गाण्याला राजस्थानी वेशभूषा करून सादरीकरण केलं जातं. अशा उपक्रमांमुळे मुलांवर चांगले संस्कार होतात, असा लक्ष्मीताईंचा अनुभव आहे.
ताईंनी समितीच्या पौरोहित्य वर्गात २००६ साली प्रथम सहभाग घेतला. तीन वर्षाचा अभ्यासक्रम गुरु निलीमाताई पारखींकडून त्यांनी पूर्ण केला. महिला पौरोहित्य हा विषय कसा पुढे नेता येईल, “पुरोहिता” म्हणून महिलांना कसं प्रशिक्षित करता येईल, या क्षेत्रात महिलांना कसे पुढे आणता येईल की, त्यायोगे समाज घडण आणि समाजाची सेवा होऊ शकेल, असा दृष्टीकोन समोर ठेवून समितीचा ‘पौरोहीत्यवर्ग’ हा आयाम म्हणून सुरू केला गेला. आतापर्यंत २०० जणी या वर्गात प्रशिक्षित झाल्या आहेत. हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. ज्यात प्रथम वर्षाला पाणिनीचं व्याकरण शिकवलं जातं. त्यावर आधारित सगळी स्त्रोत्रं आणि मंत्र शिकवले जातात. म्हणजे अथर्वशीर्ष, विष्णुसहस्रनाम इत्यादी. दुसऱ्या वर्षाला ऋग्वेदीय पुरुषसुक्त, महिम्न आणि गणपती पूजा हे शिक्षण दिलं जातं. तिसऱ्या वर्षाला यजुर्वेदीय पद्धतीनं रुद्र, सत्यनारायण पूजा आणि गंगालहरी अशा तीन विषयांचा अभ्यास असतो. सत्यनारायण पूजा ही वर्षभरात आणि मुख्यत्वे श्रावणात अधिक केली जाते. पारखी मावशींनी वैज्ञानिक पद्धतीनं, म्हणजे या प्रत्येक गोष्टीमागील अर्थ सांगून या सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत.
साधारणपणे असं नेहमी ऐकिवात येतं की, जे जसं सांगितलं आहे, तसं कर जास्ती काही प्रश्न विचारू नकोस, पण ह्या पौरोहित्य वर्गाचं वैशिष्ट्य असं आहे की, समजल्याशिवाय, पटल्याशिवाय काहीच करू नकोस. समजेपर्यंत प्रश्न विचारत रहा. पारखी मावशींचं असा एक दंडकच आहे, असं म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षी १२१ तर ह्या वर्षी १००१ महिलांच्या अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमही यशस्वीपणे घेतला आहे. अशा वर्गात लक्ष्मीताईंनी प्रशिक्षण घेतलेलं असल्यानं त्यांची या विषयाची वैचारिक बैठक पक्की झाली आहे.
ताईंनी समितीच्या घोष वर्गामध्ये वंशी वाजवण्याचं प्रशिक्षण देणंही सुरू केलं आहे. ह्या वर्षी पहिल्यांदा पुण्याच्या औंध भागाचा ३० जणींचा घोषगण तयार झाला आहे. त्यात २२ जणींचा वंशी गट आणि इतर वाद्यांचं वादन करणाऱ्या काही जणी आहेत.
लक्ष्मीताईंच्या वैविध्यपूर्ण कामांचा आवाका बघितल्यानंतर ‘आवड असली की, सवड मिळते’ ही उक्ति आपल्याला खरी वाटते. घर, कुटुंब, नोकरी, संशोधनकार्य, संगीतसाधना असं सगळं सांभाळून समाजासाठी सतत काही ना काही तरी करावं, अशी भावना त्यांच्या मनात सतत असते, त्यामुळेच त्या हे सगळं करू शकतात
आपल्या एका मैत्रिणीचा ही ओळख मुद्दाम एवढ्यासाठीच की, चला… आपणही असंच काहीतरी छान घडवण्याचा संकल्प करू या…
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे