नवरात्र…तिसरा दिवस
दुर्गा देवीचं तिसरं रूप..देवी चंद्रघंटा !!
नवरात्रात देवी दुर्गेच्या नव रूपांची पूजा केली जाते.आज नवरात्रीचा तिसरा दिवस.आपण
दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाविषयी माहिती घेऊया .
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा केली जाते.
भूतलावर धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अंध:कार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली असे सांगितले जाते.
या देवीचे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे.
तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते.
तिच्या शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे.
तिच्या डोक्यावर रत्नजडित मुकुट आहे व गळ्यात पांढर-या फुलांची माळ आहे.
या देवीला दहा हात आहेत.या दहा हातांमध्ये देवीने खड्ग, धनुष्य, बाण, तलवार, त्रिशूळ, गदा अशी शस्त्रे व कमंडलू आणि कमळ धारण केले आहे.
देवीचे वाहन सिंह असून तिची मुद्रा नेहमी युद्धासाठी सज्ज असलेली दिसते.
देवी दुर्गेने असुरांचा वध करण्यासाठी हे रूप धारण केले होते.देवीच्या घंटेच्या ध्वनीने दैत्य दानव राक्षस भयभीत होत असत.
दुष्ट व पापी वृतींचा नाश करणारं तिचं हे स्वरुप तिच्या भक्तांसाठी मात्र सौम्य आणि प्रसन्न असतं.देवी चंद्रघंटेच्या कृपेने भक्तांचे सारे पाप आणि संकटं दूर होतात.
तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो.
या देवीच्या चरणी अत्यंत भक्तीभावाने लीन होऊन तिची उपासना करणाऱ्या भक्ताला देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
“या देवी सर्व भूतेषू मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै
नमो नमः”
याच बरोबर आपण देवीच्या या स्तोत्राचे ही पठण करून आपल्या घरात तिच्या अस्तित्वाचा अनुभव घेऊन आशिर्वाद प्राप्त करुया
“ओम पिण्डज प्रवरारुढा चण्ड कोपास्त्र कैर्युता
प्रसादं तनुते मह्यं चंद्र घंटेती विश्रुता ”
सौ.वृषाली कुलकर्णी, कोपरगाव
सौजन्य – समिति संवाद ,पश्चिम महाराष्ट्र प्रांत