फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत ज्यां मार्क सेर- शार्ले यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट
पुढील वर्षी २०२४ ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये होणार असून २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यास भारत उत्सुक असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. भारताने जी – २० परिषदेचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळे भारत ऑलिम्पिक स्पर्धांचे देखील यशस्वी आयोजन करेल, असे सांगताना भारतात ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यास फ्रान्स आपल्या अनुभवाचा लाभ भारताला करुन देईल, असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत ज्यां मार्क सेर- शार्ले यांनी येथे केले.
ज्यां मार्क सेर- शार्ले यांनी सोमवारी (दि. १६) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फ्रान्सचे मुंबईतील उपवाणिज्यदूत सॅमी बुआकाझे उपस्थित होते.
रोजगार निर्मितीमध्ये मोठे योगदान
फ्रान्सच्या अनेक कंपन्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात काम करीत असून आपल्या बहुतेक कंपन्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करीत असल्याचे वाणिज्यदूतांनी सांगितले. एकट्या कॅपजेमिनी कंपनीत ३ लाख भारतीय काम करीत असल्याची त्यांनी माहिती दिली.
भारतीय विद्यार्थ्यांनी फ्रान्समध्ये यावे
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी विद्यापीठांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे तसेच फ्रान्समध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचे सूचित केले असल्याचे ज्यां मार्क सेर – शार्ले यांनी राज्यपालांना सांगितले. या दृष्टीने आपण महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांना भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठांनी आपल्यास्तरावर दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करावे, असेही आपणांस सूचित करण्यात आले असून विद्यार्थ्यांकडे फ्रान्समधील विद्यापीठाची पदवी असेल, तर त्यांना विशेष व्हिजा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
को इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स उभय देशांमधील व्यापार वाढविण्यासाठी; तर आलियान्झ फ्रांस ही संस्था फ्रेंच भाषा प्रचार प्रसारासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
फ्रान्स भारताचा नवा सर्वोत्तम मित्र असल्याचे सांगून आज उभय देशांमध्ये संरक्षण, आण्विक यांसह सर्व क्षेत्रांमधील संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
फ्रेंच ही सर्वात लोकप्रिय परकीय भाषा
भारतीय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये फ्रेंच ही सर्वात लोकप्रिय परकीय भाषा आहे. हजारो मुले फ्रेंच शिकतात. ही मुले उभय देशांमधील सदिच्छा राजदूत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
भारत आणि फ्रान्समध्ये कौशल्य विकासातील सहकार्य वाढावे तसेच उभय देशांमधील सांस्कृतिक बंधाचे विद्यापीठ स्तरावरील सहकार्यात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
राज्यातील विद्यापीठांचे अमेरिकन विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य सुरू झाले असून फ्रेंच विद्यापीठांसोबत देखील असेच सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.