संवादातून संस्कार -आश्लेषाताईंचा यशस्वी मार्ग
आहारतज्ज्ञ आणि शिक्षिका म्हणून काम करत असतानाच नव्या पिढीला उत्तम संस्कार देण्याचं काम आश्लेषाताई अगदी स्वयंस्फूर्तीनं करतात. त्यातून जे साध्य होतं, ते खूप महत्त्वाचं आहे. त्या कामाची ही ओळख…
उमलत्या पिढीवर आणि युवकांवर संस्कार करणं खूप महत्त्वाचं आहे. हे सगळ्यांना मान्यही असतं. पण त्यासाठी प्रत्यक्ष कृतीच करावी लागते आणि तीच खूप महत्त्वाची असते. पुण्यातील सौ. आश्लेषा सुनील भागवत यांची ओळख झाली की, संवादातून आणि चर्चेतूनही संस्कार देण्याचं खूप मोठं काम उभं राहू शकतं, याची आपल्याला खूणगाठ पटते.
आश्लेषाताई मूळच्या नागपूरच्या. त्यांचं आजोळही नागपूरचंच आहे. आजोबा सदाशिव श्रीधर जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडून आणि आजी लीला या दोघांकडून त्यांना खूप चांगले संस्कार मिळाले. आई सौ. ममता गद्रे यांचं वय ८० आहे आणि राष्ट्र सेविका समितीच्या कामात त्यांचा उत्साही सहभाग असतो. आश्लेषाताई, एक बहिण आणि दोन भाऊ आहेत अशी चार भावंडं आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला शक्य होईल तसा हातभार लावण्याचं काम हे चौघेही सातत्यानं करत असतात. आश्लेषाताईंनी फूड न्यूट्रिशियनमधील एम. एस्ससी. ही पदवी नागपूर विद्यापीठातून सुवर्णपदकासह संपादित केली आहे. विवाहानंतर त्या पुण्यात आल्या.
संघ आणि समितीचे संस्कार मनावर कायमचे ठसलेले असल्यामुळे त्या संस्कारांचा प्रचार, प्रसार त्या अखंडपणे करत असतात. आहारतज्ज्ञ म्हणून त्या ज्या ज्या व्यायामशाळांमध्ये (जिम) युवकांच्या समुपदेशनासाठी आणि त्यांना आहार सल्ला देण्यासाठी जातात तिथे आहार, व्यायाम या संबंधीच्या मार्गदर्शनाबरोबरच युवकांशी संवाद साधताना त्यांना चांगलं वागण्याचं महत्त्व, अभ्यासाचं महत्त्व, आई-वडिलांविषयीचा आदरभाव हे आणि असे अनेक विषय त्या समजावून सांगतात.
खरं तर एक आहारतज्ज्ञ म्हणून आहाराविषयीचा सल्ला देणं अपेक्षित असलं, तरी आहाराचा सल्ला देतानाच समुपदेशनातून वाईट वृत्तींपासून त्यांना परावृत्त करायला त्या मदत करतात, आवश्यक ते प्रयत्नही करतात. यासंबंधीचा त्यांचा एक अनुभव खूप बोलका आहे. ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला आलेल्या एका युवकाला जिममध्ये चांगल्या वर्तणुकीसंबंधीचं मार्गदर्शन केल्यानंतर त्याला आश्लेषाताईंच हे बोलणं मनोमन पटलं आणि त्याने त्यांना चटकन खाली वाकून नमस्कार केला. जिममध्ये हे दृश्य खरोखर खूपच दुर्मिळ म्हणावं असंच. बहुदा पहिल्यांदाच घडलं असेल. त्यामुळे सगळेजण ते पाहून चकितच झाले.
अध्यापनाची आवड असल्यामुळे आश्लेषाताई दहावीपर्यंतच्या आयसीएससी, तसंच सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान या विषयाचे क्लास घेतात. ही सर्व मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी असतात. त्यामुळे भारतीय सणवार, मराठी भाषा, आपली संस्कृती यापासून हे विद्यार्थी खूपच दूर असतात. हे लक्षात आल्यानंतर आश्लेषाईंनी विद्यार्थ्यांना आपले श्लोक शिकवण्याचं काम सुरू केलं. आपल्या प्रत्येक सणाची माहिती त्यांना देणं, चांगलं वाचन करायला प्रवृत्त करणं, थोरांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देणं, जवळच भरत असलेल्या संघाच्या शाखेमध्ये त्यांनी जावं यासाठी प्रयत्न करणं अशा अनेक छोट्या-छोट्या, पण खूप महत्त्व असलेल्या गोष्टी त्या सातत्यानं करत असतात. आश्लेषाईंच्या शिकवणी वर्गाला जाणं म्हणजे उत्तम यशाची हमी असते. शिवाय, विद्यार्थ्यांवर खूप चांगले संस्कारही होतात. त्यामुळे अनेक पालक तर ताई, तुम्ही हॉस्टेल सुरू करा. म्हणजे मुलं तुमच्या सहवासात राहतील, असाही आग्रह त्यांच्याकडे धरतात.
आहारविषयक व्याख्यानंही आश्लेषाताई देतात. तसंच या विषयावर त्यांचे लेखही प्रसिद्ध होत असतात. त्यातही त्या आपल्या संस्कृतीविषयीची माहिती आवर्जून देतात. संस्कृतीचं महत्त्व सांगतात. भागवत कथाही त्या करतात. त्यातूनही आपल्या आचार विचार व संस्कारांचा शक्य होईल तसा प्रचार आणि प्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पुण्यातील अनेक नामांकित जिममध्ये त्यांनी आहारविषयक सल्ला देण्याचं तसंच समुपदेशनाचं काम केलं आहे. अर्थातच फक्त दिलेलं काम करायचं एवढ्यावर त्या कधीच थांबत नाहीत. तर ज्या ज्या मार्गानं शक्य होईल, त्या त्या मार्गानं संस्कार देण्याचं काम त्या करत राहतात. गेली तब्बल तीस वर्षं त्यांचं हे काम सुरू आहे.
आपण स्वीकारलेलं काम करताना देखील संस्कारांना बळकटी देण्याचं काम कसं करता येतं, याचं उदाहरण म्हणजे आश्लेषाताई. चला… आपणही असंच काहीतरी छान घडवण्याचा संकल्प करू या…
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे