एकीकडॆ महाराष्ट्रातून पाऊस परतीच्या मार्गावर गेला असला तरी पुढील काही दिवसांत मुंबईत तेज चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वादळाचा अंदाज असल्याने हवामान खात्याकडून मुंबईकरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१ ऑक्टोबरला मुंबईसह गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागांमध्ये तेज चक्रीवादळ धडकणार आहे. अरबी समुद्रातील पश्चिम-वायव्य दिशांना येणाऱ्या या वादळामुळं नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे . याशिवाय समुद्रात कुणीही न उतरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. येत्या २१ तारखेपासून मुंबईसह किनारी भागांमध्ये सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.