एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा १८ वा आज सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात उपकर्णधार शादाब खान खेळत नसल्याचे त्याने नाणेफेकीदरम्यान सांगितले. शादाबच्या जागी उसामा मीरला संधी देण्यात आली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने एकही बदल केलेला नाही.
आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने तीनपैकी एक सामन्यात विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने तीनपैकी एका सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला जिंकणे भाग आहे. पाकचा कर्णधार बाबर आझमने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 9 डावात 73.50 च्या उत्कृष्ट फलंदाजीच्या सरासरीने 588 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सध्याच्या आकडेवारीवरून पाकिस्तानचा वरचष्मा आहे जी ऑस्ट्रेलियासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.