स्मिताताईंचा ध्यास परिवर्तनाचा..
शालेय वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थिनींवर तसंच युवकांवर चांगले संस्कार केले, त्यांच्याशी आपुलकीनं संवाद साधला, त्यांना प्रेमानं काही सल्ला दिला, तर त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो. त्यांच्या वर्तणुकीत लक्षणीय सुधारणा होते. अभ्यासात प्रगती होते, असा स्मिताताईंचा अनुभव आहे. हेच काम त्या गेली अनेक वर्ष सातत्यानं करत आहेत.
परिवर्तन हा शब्द आपण नेहमीच एैकतो. या विषयावर खूप लिहिलंही जातं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात परिवर्तन फाऊंडेशन ही संस्था स्मिताताई देशपांडे यांनी स्थापन केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेलं स्मिताताईंचं काम बघितलं की, त्यांच्या संस्थेचं परिवर्तन हे नाव किती सार्थ आहे, याची खात्री आपल्याला पटते.
स्मिताताई मूळच्या नाशिकच्या. एम. कॉम. पर्य़ंतचं शिक्षण त्यांनी नाशिकमध्ये पूर्ण केलं. लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. विविध पुस्तकांच्या वाचनातून आपण गरजूंना काहीतरी मदत करावी, ही मनोमनीची इच्छा होती. विवाहानंतर बार्शीत आल्यावर कुटुंबातील सगळ्यांनीच त्यांना प्रोत्साहन दिलं आणि स्मिताताईंनी एमएसडब्ल्लू पूर्ण केलं. या शिक्षणामुळे आणि सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेमुळे स्मिताताई विविध कार्यक्रमांमध्ये जाऊन प्रबोधनपर व्याख्यानं देऊ लागल्या. महिला सक्षमीकरण हा त्यांचा आवडता विषय. महिलांना छोटे उद्योग, व्य़वसाय सुरू करण्यासाठी विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं, शासनाच्या कार्यालयांची मदत घेण्याचं काम त्या शहर आणि ग्रामीण भागात अनेक वर्ष करत होत्या. लायन्स क्लबच्या माध्यमातूनही त्यांनी लक्षवेधी कार्य केलं आणि त्यामुळे सलग दोन वेळा त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. उत्कृष्ट अध्यक्षा म्हणून पारितोषिक देऊन लायन्स क्लबच्या वरिष्ठांनीही त्यांना सन्मानित केलं.
बार्शीतील एमआयटी स्कूलमध्ये सहाय्यक ग्रंथपाल म्हणूनही स्मिताताईंनी काही वर्ष नोकरी केली. त्यावेळी शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांची उकल त्यांना झाली. हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांनी मुलांना मार्गदर्शन करायला, त्यांना सल्ला द्यायला, त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. हेच काम अधिक व्यापक व्हावं असं सतत जाणवायला लागल्यामुळे त्यांनी स्वतःची परिवर्तन फाऊंडेशन ही सामाजिक संस्था स्थापन केली.
संस्थेच्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण भागात अनेक उपक्रम केले जातात. शालेय विद्यार्थी आणि युवकांवर संस्कार करण्याचं महत्त्वपूर्ण काम स्मिताताई करतात. चांगली वर्तणूक कशी महत्त्वाची आहे, व्यसनं करण्यामुळे कोणते तोटे होतात, अभ्यासात प्रगती कशी करता येते, चांगलं यश कसं मिळवता येतं, अशा अनेक विषयांवर त्या शाळा-शाळांमध्ये जाऊन व्याख्यानं देतात. मुलांशी, युवकांशी संवाद साधतात. त्याचा खूप चांगला परिणाम होतो. मुलांमध्ये चांगले विचार रुजवायला या उपक्रमाची खूप मदत होते, असा त्यांचा अनुभव आहे. या व्याख्यान उपक्रमाचा परिणाम असा होतो की, अनेक शालेय विद्यार्थी तसंच युवक स्मिताताईंना आवर्जून भेटायला येतात, अनेकजण फोन करतात आणि मोकळेपणानं त्यांचे प्रश्न मांडतात. त्यांना सल्ला विचारतात.
परिवर्तन फाऊंडेशनचे सचिव फुलचंद जावळे हे स्वतः क्रीडा शिक्षक असल्याने गेल्या ५ वर्षांपासून उन्हाळ्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी शिबिराच्या आयोजनाचा उपक्रम संस्थेतर्फे केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि विविध खेळांमध्ये त्यांची निपुणता वाढावी, हा या शिबिराचा उद्देश असतो. त्यात त्यांना विविध मैदानी खेळ, तसंच तलवारबाजी, घोडेस्वारी, पोहणं, कराटे आदींचं प्रशिक्षण दिलं जातं. या शिबिराचाही मुलांना खूप फायदा होतो.
स्मिताताई हे जसं काम विद्यार्थ्यांसाठी करतात तसाच त्यांच्या कामाचा आणखी एक पैलू म्हणजे सेवा. जिथे कुठे महिलांसाठी धावून जाण्याचा प्रसंग येतो, तिथं त्या पोहोचलेल्या असतात. परिवर्तन फाऊंडेशन महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे. बार्शी शहर आणि तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या अल्पवयीन मुली, महिला, अनाथ मुलांसाठी गेली ५ वर्षे समुपदेशक म्हणून त्या दिवसाही आणि वेळ प्रसंगी रात्री अपरात्री देखील काम करतात. हे काम त्या पूर्णपणे समाजसेवी वृत्तीनं आणि कोणतंही मानधन न घेता करतात.
स्मिताताईंच कार्य त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या नावाला अगदी साजेसं असंच आहे. चला… आपणही असंच काहीतरी छान घडवण्याचा संकल्प करू या…
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे