पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे दिल्ली-गाझियाबाद-मीरत आरआरटीएस मार्गिकेच्या प्राधान्यक्रम टप्प्याचे उद्घाटन केले. त्यांनी याच कार्यक्रमात भारतातील प्रादेशिक वेगवान स्थानांतरण यंत्रणेचा (आरआरटीएस)प्रारंभ करताना साहिबाबाद ते दुहाई डेपोदरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिडएक्स गाडीला झेंडा दाखवून रवाना देखील केले. तसेच पंतप्रधानांनी यावेळी बेंगळूरू मेट्रो सेवेच्या पूर्व-पश्चिम मार्गीकेतील दोन टप्प्यांचे लोकार्पण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो भारत या प्रादेशिक वेगवान रेल्वे गाडीतून स्वतः प्रवास देखील केला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज नमो भारत रेल्वे ही भारताची पहिली वेगवान रेल्वे सेवा जनतेला समर्पित होत आहे हा अत्यंत स्मरणीय दिवस आहे. पंतप्रधानांनी चार वर्षांपूर्वी दिल्ली-गाझियाबाद-मीरत आरआरटीएस मार्गिकेच्या कामाची पायाभरणी केली होती, त्याचे आज त्यांनी स्मरण केले आणि साहिबाबाद ते दुहाई डेपो या टप्प्यात या रेल्वेच्या परिचालनाची सुरुवात देखील केली. ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे ते पूर्ण करून त्यांचे उद्घाटन करण्याप्रती सरकारच्या वचनबद्धतेचे पुनरुच्चार करून येत्या दीड वर्षात आरआरटीएसच्या मीरत टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करण्यासाठी आपण उपस्थित राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळच्या वेळात नमो भारत रेल्वे गाडीतून प्रवास करण्याचा अनुभव त्यांनी उपस्थितांशी सामायिक केला आणि देशातील रेल्वेचा कायापालट होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सध्या नवरात्र सुरु आहे याचा उल्लेख करुन पंतप्रधान मोदी म्हणाले की नमो भारत रेल्वेला कात्यायनी मातेचा आशीर्वाद मिळाला आहे. आज उद्घाटन झालेल्या नमो भारत रेल्वे गाडीच्या चालक तसेच संपूर्ण सहाय्यक कर्मचारीवर्ग महिला आहेत. “नमो भारत ही गाडी म्हणजे देशातील महिलाशक्तीच्या मजबुतीचे प्रतीक आहे,” मोदी म्हणाले.
नवरात्रीच्या शुभ प्रसंगी पंतप्रधानांनी आजच्या प्रकल्पांसाठी दिल्ली, एनसीआर आणि पश्चिमी उत्तर प्रदेशातील लोकांचे अभिनंदन केले. नमो भारत गाड्या आधुनिक तसेच वेगवान आहेत. “नमो भारत रेल्वे गाडी नव्या भारताचे आणि नव्या निर्धारांच्या दिशेने प्रवास निश्चित करत आहे.
आजच्या कार्यक्रमात, देशातील राज्यांच्या विकासामध्ये भारताचा देखील विकास होत आहे या विश्वासाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.ते म्हणाले की मेट्रो रेल्वेच्या दोन टप्प्यांमुळे बेंगळूरू या माहिती तंत्रज्ञानाचे मोठे केंद्र असलेल्या शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी मजबूत होईल. मेट्रो रेल्वेतून दररोज सुमारे 8 लाख प्रवासी प्रवास करतात अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
“21 व्या शतकातील भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती आणि विकासाची स्वतःची गाथा लिहित आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी चांद्रयान 3 च्या अलीकडील यशाचा उल्लेख केला आणि जी 20 च्या यशस्वी आयोजनाचाही उल्लेख केला ज्यामुळे भारत संपूर्ण जगासाठी आकर्षणाचा केंद्र बनला आहे. त्यांनी आशियाई खेळांमध्ये शंभरहून अधिक पदके जिंकण्याची विक्रमी कामगिरी, भारतात 5G चा प्रारंभ व विस्तार आणि डिजिटल व्यवहारांची विक्रमी संख्या यांचा उल्लेख केला. जगभरातल्या करोडो लोकांसाठी जीवनरक्षक ठरलेल्या स्वदेशी लसींचा उल्लेखही पंतप्रधान मोदी यांनी केला. उत्पादन क्षेत्रातील भारताची झेप अधोरेखित करत मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप आणि संगणक उत्पादनासाठी बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात उत्पादन एकके उभारण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी लढाऊ विमाने आणि विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत यांचा उल्लेख करत संरक्षण क्षेत्रातील निर्मितीबद्दलही सांगितले. “नमो भारत ट्रेनदेखील मेड इन इंडिया आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. फलाटावर बसवण्यात आलेले स्क्रीन दरवाजे देखील भारतात बनवले आहेत. हेलिकॉप्टर आणि विमानांच्या तुलनेत नमो भारत गाडीतील आवाजाची पातळी कमी असल्याची माहितीही पंतप्रधान मोदी यांनी दिली.
नमो भारत ही भविष्यातील भारताची झलक आहे आणि वाढत्या आर्थिक ताकदीसह राष्ट्राच्या परिवर्तनाचे उदाहरण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. हा 80 किमीचा दिल्ली मेरठ पट्टा ही फक्त सुरुवात असून पहिल्या टप्प्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक भाग नमो भारत गाडीने जोडले जातील. आगामी काही दिवसात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि रोजगाराचे नवीन मार्ग निर्माण करण्यासाठी देशाच्या इतर भागातही अशीच व्यवस्था निर्माण केली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
सध्याच्या शतकातील हे तिसरे दशक हे भारतीय रेल्वेच्या परिवर्तनाचे दशक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “मला छोटी स्वप्ने पाहण्याची आणि हळू चालण्याची सवय नाही. मला आजच्या तरुण पिढीला हमी द्यायची आहे की या दशकाच्या अखेरीस भारतीय रेल्वेगाड्या जगातल्या रेल्वेगाड्यांच्या तुलनेत कुठेच कमी नसतील”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सुरक्षा, स्वच्छता, सुविधा, समन्वय, संवेदनशीलता आणि क्षमता यामध्ये भारतीय रेल्वे जगात एक नवा पायंडा गाठेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भारतीय रेल्वे 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट लवकरच गाठेल. त्यांनी नमो भारत आणि वंदे भारत यासारख्या आधुनिक गाड्या आणि अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकाचे अद्ययावतीकरण यासारखे उपक्रम नमूद केले. “अमृत भारत, वंदे भारत आणि नमो भारत, त्रिमूर्ती या दशकाच्या अखेरीस आधुनिक रेल्वेचे प्रतीक बनतील”, असे पंतप्रधान म्हणाले.
मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दिल्लीतील सराय काले खान, आनंद विहार, गाझियाबाद आणि मेरठ बस स्थानके, मेट्रो स्थानके आणि रेल्वे स्थानके नमो भारत प्रणालीद्वारे जोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले. चांगली हवा गुणवत्ता प्रदान करणे, कचरा डंपयार्ड्सपासून मुक्तता, चांगल्या शैक्षणिक सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारणे, याद्वारे सर्व नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि जीवन गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यावर सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार भूतकाळापेक्षा अधिक खर्च करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. जमीन, हवाई आणि समुद्र मार्गांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला. देशातील नद्यांमध्ये शंभरहून अधिक जलमार्ग विकसित केले जात असून गंगेत वाराणसीपासून हल्दियापर्यंत सर्वात मोठा जलमार्ग विकसित होत आहे, असे सांगून त्यांनी जलवाहतूक व्यवस्थेची उदाहरणे दिली. शेतकरी आता अंतर्देशीय जलमार्गाच्या साहाय्याने आपला माल प्रदेशाबाहेर पाठवू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी गंगाविलास रिव्हर क्रूझने नुकत्याच पूर्ण केलेल्या प्रवासाचा देखील उल्लेख केला, ज्यामध्ये, या पर्यटन बोटीने नदीमध्ये 3200 किमी पेक्षा जास्त प्रवास केला आणि जगातील सर्वात लांब नदी पर्यटनाचा जागतिक विक्रम नोंदवला. त्यांनी देशातील बंदर पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आधुनिकीकरणाविषयी माहिती दिली, ज्याचा फायदा कर्नाटकसारख्या राज्यांनाही मिळत आहे. जमिनीवरील नेटवर्क बद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आधुनिक द्रुतगती महामार्गांचे जाळे विस्तारण्यासाठी 4 लाख कोटींहून अधिक खर्च केले जात आहेत, तर नमो भारत किंवा मेट्रो रेल्वे सारख्या आधुनिक गाड्यांवर 3 लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.
दिल्लीतील मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या विस्ताराच्या धर्तीवर उत्तर प्रदेशातील नोएडा, गाझियाबाद, लखनौ, मेरठ, आग्रा आणि कानपूर या शहरांमध्येही अशीच योजना राबवली जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकातही बंगळूरू आणि म्हैसूरमध्ये मेट्रोचा विस्तार केला जात आहे. वाढलेल्या हवाई संपर्कावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 9 वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे आणि भारताच्या विमान कंपन्यांनी 1000 हून अधिक नवीन विमानांची मागणी नोंदवली आहे. पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या वेगवान प्रगतीची माहिती दिली, आणि चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या चांद्रयानाचा उल्लेख केला. भारताने 2040 पर्यंतचा पथदर्शक आराखडा तयार केला असून, यामध्ये मानवाच्या अंतराळ प्रवासासाठी गगनयान मोहीम आणि भारताचे अंतराळ स्थानक स्थापन करणे, याचा समावेश असल्याचे ते म्हणाले. “तो दिवस दूर नाही, जेव्हा आपण आपल्या अंतराळ यानातून पहिल्या भारतीयाला चंद्रावर उतरवू”, पंतप्रधानांनी सांगितले. या घडामोडी देशातील तरुणांसाठी असून, त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
शहरी प्रदूषण कमी करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. यामुळे देशात इलेक्ट्रिक बसचे जाळे वाढत आहे. केंद्र सरकारने राज्यांना 10,000 इलेक्ट्रिक बस देण्याची योजना सुरू केली आहे. त्यांनी माहिती दिली की भारत सरकार 600 कोटी रुपये खर्च करून दिल्लीत 1300 हून अधिक इलेक्ट्रिक बस चालवण्याची तयारी करत आहे. यापैकी 850 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस आधीच दिल्लीत सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, बंगळुरूमध्येही, भारत सरकारने 1200 हून अधिक इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी 500 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. “केंद्र सरकार प्रत्येक शहरात आधुनिक आणि हरित सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे, मग ते दिल्ली असो, उत्तर प्रदेश असो किंवा कर्नाटक असो,” ते म्हणाले.
देशात विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये नागरी सुलभतेला प्राधान्य दिले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मेट्रो किंवा नमो भारत सारख्या रेल्वे गाड्या प्रवाशांच्या जीवनात किती सुलभता आणतील आणि दर्जेदार पायाभूत सुविधा देशातील तरुण, व्यापारी आणि नोकरदार महिलांसाठी नवीन संधी कशा निर्माण करतील, यावर त्यांनी प्रकाश टाकला. “रुग्ण, डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना रुग्णालयासारख्या सामाजिक पायाभूत सुविधांचा लाभ मिळेल. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे पैशाची गळती रोखून, सुरळीत व्यवहार करणे सुनिश्चित होईल,” ते पुढे म्हणाले.
सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात शेतकरी, कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडे घेतलेल्या निर्णयांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. त्यांनी माहिती दिली की सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत मूल्या (एमएसपी) मध्ये मोठी वाढ केली असून, त्यानुसार डाळींच्या एमएसपीमध्ये 425 रुपये प्रति क्विंटल, मोहरी 200 रुपये आणि गहू 150 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ केली आहे. 2014 मध्ये गव्हाचा एमएसपी 1400 रुपये प्रति क्विंटल होता तो आता 2000 रुपयांच्या पुढे गेला आहे, गेल्या 9 वर्षांत डाळींचा एमएसपी दुप्पट झाला आहे आणि मोहरीचा एमएसपी या काळात 2600 रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे. “यामधून, शेतकऱ्यांना उत्पादनाच्या किमतीच्या दीडपट जास्त आधारभूत मूल्य देण्याची आमची बांधिलकी दिसून येते”, ते पुढे म्हणाले. परवडणाऱ्या दरात युरियाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची पंतप्रधानांनी माहिती दिली. ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय बाजारात 3000 रुपये किंमत असलेल्या युरियाच्या पिशव्या भारतीय शेतकऱ्यांना 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध झाल्या आहेत. यावर सरकार दरवर्षी 2.5 लाख कोटींहून अधिक खर्च करत आहे.
पिकांच्या कापणीनंतर उरलेला भाताचा पेंढा किंवा तण यांचा वापर करण्यावर केंद्र सरकार भर देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशात सर्वत्र जैव इंधन आणि इथेनॉल युनिट्स उभारली जात असून नऊ वर्षांपूर्वीचे देशाचे इथेनॉलचे उत्पादन आता दहापटींनी वाढले आहे, इथेनॉल च्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत अंदाजे 65 हजार कोटी रुपये मिळाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. “देशातील शेतकऱ्यांना केवळ गेल्या दहा महिन्यात अंदाजे 18 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिली आहे, असे त्यांनी सांगितले. मीरत – गाझियाबाद पट्ट्यातील शेतकऱ्यांविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की वर्ष 2023 मध्ये केवळ 10 महिन्यांत इथेनॉलसाठी 300 कोटींहून अधिक रक्कम अदा करण्यात आले आहेत.
याशिवाय उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या किमतीत 500 रुपयांची सवलत, 80 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना निःशुल्क शिधावाटप, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 4 टक्के महागाई भत्ता आणि डी आर तसेच गट ब आणि क च्या लाखो अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस हे सणासुदीच्या कालखंडाची भेट म्हणून घोषित केल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे बाजारपेठांमध्ये आर्थिक घडामोडींना चालना मिळून संपूर्ण अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होईल, असे पंतप्रधान म्हणाले.
अशाप्रकारचे संवेदनशील निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक कुटुंबात सणांचा आनंद द्विगुणित होतो. आणि प्रत्येक कुटुंबातील आनंद आणि उत्साहामुळे सणांसाठी आवश्यक वातावरणाची निर्मिती होते. “तुम्ही सर्व माझे कुटुंबीय आहात, आणि म्हणूनच तुम्हीच माझे प्राधान्य आहात. तुमच्यासाठी विविध कार्ये केली जात आहेत. जर तुम्ही आनंदी असाल तर मी आनंदी असेन. जर तुम्ही सक्षम असाल तर देश सक्षम होईल.” असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यावेळी उपस्थित होते, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले
दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आर आर टी एस कॉरिडॉरचे उद्घाटन
दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आर आर टी एस हा 17 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर, साहिबादला ते ‘दुहाई डेपो’ ला गाझियाबाद, गुलधर आणि दुहाई या स्थानकांसह जोडेल. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरची पायाभरणी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती.
जागतिक दर्जाच्या नवीन वाहतूक पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे देशातील प्रादेशिक दळणवळण व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी अनुरूप प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली (आरआरटीएस) प्रकल्प विकसित केला जात आहे. आरआरटीएस ही एक नवीन रेल्वे-आधारित, अर्ध-जलद -वेग, उच्च-वारंवारिता असलेली प्रवासी वाहतूक प्रणाली आहे. ताशी 180 किलोमीटरच्या गतीसह, आरआरटीएस हा एक परिवर्तनात्मक, प्रादेशिक विकास उपक्रम आहे, ज्याची रचना दर 15 मिनिटांनी इंटरसिटी प्रवासासाठी अतिजलद रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केली आहे, जी आवश्यकतेनुसार दर 5 मिनिटांच्या वारंवारतेपर्यंत जाऊ शकते.
एनसीआर मध्ये एकूण आठ आरआरटीएस कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत, त्यापैकी दिल्ली – गाझियाबाद – मेरठ कॉरिडॉर, दिल्ली– गुरुग्राम – एसएनबी – अल्वर कॉरिडॉर; आणि दिल्ली-पानिपत कॉरिडॉरसह तीन कॉरिडॉर पहिल्या टप्प्यात कार्यान्वित करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ आरआरटीएस 30,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केला जात आहे आणि गाझियाबाद, मुरादनगर आणि मोदीनगर या शहरी भागातून जात एका तासापेक्षा कमी वेळेत दिल्लीला मेरठशी जोडेल.
देशात विकसित होत असलेली आरआरटीएस ही एक अत्याधुनिक प्रादेशिक मोबिलिटी सुविधा आहे आणि तिची तुलना जगातील सर्वोत्कृष्ट सुविधेशी करता येऊ शकते. ही देशातील सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक इंटरसिटी प्रवास सुविधा प्रदान करेल. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या अनुषंगाने, आरआरटीएस नेटवर्कमध्ये रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके, बस सेवा यांसह व्यापक मल्टी-मोडल-एकत्रीकरण असेल. या परिवर्तनात्मक प्रादेशिक गतिशीलता सुविधेमुळे प्रदेशात आर्थिक घडामोडीना चालना मिळेल; रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवा संधी अधिक सुलभपणे उपलब्ध होतील; आणि वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी करण्यात मदत होईल.
बंगळुरू मेट्रो
पंतप्रधानांकडून औपचारिकपणे राष्ट्राला समर्पित केले जाणारे दोन मेट्रो मार्ग बैयप्पनहळ्ळीला कृष्णराजपुराशी आणि केंगेरीला चल्लाघट्टाशी जोडतील. या कॉरिडॉरवर जनतेची प्रवासाची सोय व्हावी यासाठी, औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता हे दोन मेट्रो मार्ग 9 ऑक्टोबर 2023 पासून सार्वजनिक सेवेसाठी खुले करण्यात आले आहेत.