तब्बल २० वर्षांनंतर विश्वचषक सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाला हारवत भारताने आज ऐतिहासिक विजय नोंदवला. त्याचबरोबर लक्ष्याचा पाठलाग करणे भारताला अवघड जाते हा आरोपही पुसून काढला. विराट कोहलीच्या झुंजार ९५ धावांच्या खेळीमुळे भारताने २७४ धावांचे आव्हान पार केले व न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. यंदाच्या विश्वचषकातील हा भारताचा सलग पाचवा विजय आहे. या विजयाबरोबरच भारत अंकतालिकेत अव्वल स्थानी जाऊन बसला आहे. गेल्या विश्वचषकातील उपांत्या फेरीतील पराभावाचा वचपाही या विजयाने निघाल्याची भावना क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान भारताचा सामना न्यूझीलंडशी होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा केल्या. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने शतकी खेळी करत १३० धावा केल्या तर रचिन रवींद्रने ७५ धावा केल्या. भारताच्या मोहम्मद शमीने ५४ धावांच्या बदल्यात तब्बल ५ बळी घेत न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. त्यानंतर आलेल्या भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली मात्र कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर तंबूत लवकर परतल्यामुळे सामन्यातील चुरस वाढली. मात्र माजी कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीने पुन्हा एकदा खेळ सावरला आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. त्याला आधी के एल राहूल व नंतर रवींद्र जडेजा यांनी मोलाची साथ दिली. विराट कोहली याने ९५ धावा, रोहित शर्माने ४६ धावा तर रवींद्र जडेजाने ३९ धावा केल्या. न्यूझीलंडच्या लोकी फर्ग्युसन याने २ खेळाडू बाद केले.