आज दसऱ्याचा सण… आपट्याची पाने आज सोने म्हणून देत शुभेच्छा दिल्या जातात. महाराष्ट्रात दसरा सणाचे राजकीय महत्व देखील जास्त आहे. त्याच कारण आहे विजयादशमीच्या दिवशी होणारे दसरा मेळावे. दादरमधील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडेल.ठाकरे गटाने या मेळाव्याचे दोन टीझर प्रदर्शित केले असून त्यात शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. तर यंदा मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडेल. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्र व राज्य सरकारची कामगिरी, पूर्ण केलेले प्रकल्प व योजना, दुष्काळावरील उपाययोजना, सरकार आपल्या दारी सारख्या उपक्रमांची माहिती या निमित्ताने देणार आहेत. दोन्ही गटांनी मुंबईत ठिकठिकाणी फलकबाजी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा आज पार पडेल. या दसरा मेळाव्यातील भाषणांकडे राज्याचे लक्ष असणार आहे.
तसेच संघस्थापनेच्या शतकोत्तर वर्षाची तयारी या पार्श्वभूमीवर आज नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संगीतकार व गायक पदमश्री शंकर महादेवन उपस्थित राहणार आहेत.आज होणाऱ्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार आहे, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.