भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण विचारांमुळे आणि दूरदृष्टीमुळे अखिल जगताच्या चिंतनाला ‘वसुधैव कुटुंबकम’ ची दिशा मिळाली. जी – २० समुहाची अर्थकेंद्रित संकल्पना आता मानवकेंद्रित झाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच आपल्या देशाच्या खेळाडूंनी १०० हून अधिक पदके जिंकून आपल्या सर्वांनाच प्रोत्साहित, आनंदित केले आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन!
‘चांद्रयाना’ च्या निमित्ताने उदयोन्मुख भारताच्या शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकही जगाने पाहिली. आमच्या शास्त्रज्ञांच्या तंत्रज्ञान व तंत्रकुशलतेला नेतृत्वाच्या इच्छाशक्तीची जोड मिळाली.
अयोध्येतील राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने प्रत्येकाच्या हृदयात राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी आणि सर्वत्र प्रेम, पुरुषार्थ व उल्हासाचे वातावरण आणि सद्भावना निर्माण व्हावी.
शतकानुशतके संकटांच्या परंपरेशी झुंज देऊन विजयी झालेले आपले भारतराष्ट्र भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर दृढनिश्चयाने मार्गक्रमण करत आहे.
आजच्या जगाच्या समकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी, काळाशी सुसंगत व स्वतःच्या मूल्यांच्या आधारे भारताने नवे रूप घेऊन उभे राहावे, ही जगाचीही अपेक्षा आहे.
भारताच्या ‘स्व’स्वरूपाची ओळख आणि हिंदू समाजाची अस्मिता टिकवून ठेवण्याचा विचार स्वाभाविकच आहे.
संकुचित, निखळ भौतिकवाद आणि टोकाच्या उपभोगवादी दृष्टीवर आधारित विकासाच्या मार्गांमुळे मानवता आणि निसर्ग हळूहळू पण निश्चितपणे विनाशाकडे वाटचाल करत आहेत.
सरकारचे ‘स्व’ आधारित युगानुकूल धोरण, प्रशासनाचे तत्पर, सुसंगत, लोकाभिमुख कार्य आणि समाजाचा काया-वाचा-मनाने सहभाग व पाठबळ यातूनच देश परिवर्तनाच्या दिशेने मार्गक्रमण करीत जाईल.
मणिपूरमध्ये भयंकर आणि उद्वेगजनक परिस्थितीतही आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या शांत मनाने परिस्थिती हाताळत सर्वांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न केला त्या स्वयंसेवकांचा आम्हाला अभिमान आहे.
आपला हा देश, एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून जगाच्या इतिहासातील सर्व चढ-उतारांना तोंड देत आपल्या भूतकाळातील धाग्यांशी असलेले अतूट नाते जपत जीवित आहे.
जगाने थक्क व्हावे, पण आकर्षितही व्हावे अशा एकात्मतेच्या परंपरेचा आपल्याला वारसा मिळाला आहे. त्याचे रहस्य निःसंशयपणे आपली सर्वसमावेशक संस्कृती आहे.
मातृभूमीची भक्ती, पूर्वजांविषयीचा अभिमान आणि समान संस्कृती ही तीन तत्वेच आमच्या एकतेचे अक्षुण्ण सूत्र आहे.
फितना, फसाद (संघर्ष) आणि कितान दूर सारून सुलह, सलामती आणि अमन यांच्या वाटेने जाण्यातच श्रेष्ठता आहे असा अन्य उपासना पद्धतीतील माणसांचा देखील विश्वास आहे.
समान पूर्वजांचे वंशज, एकाच मातृभूमीची संतान, एका संस्कृतीचे वारसदार असलेले आपण आपली परस्पर एकता विसरलो आहोत. आपले ते मूळ एकत्व समजून घेऊन त्याच आधारावर पुन्हा एकत्र यायला हवे.
एकमेकांबद्दल असलेल्या समस्या सोडविण्यासाठी धैर्याने, संयम आणि सहनशीलतेने, आपल्या वाणीला, कृतीला अतिरेकी कोप वा भयापासून दूर ठेवून, दृढनिश्चयाने आणि संकल्पबद्ध होऊन दीर्घकाळ सतत प्रयत्न करणे अनिवार्य आहे.
सुसंघटित सामर्थ्यसंपन्न समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सरकार, प्रशासनाला केलेले योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय आहे.
मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे.
समाजाच्या आचरणात आणि उच्चारणात संपूर्ण समाज आणि आपल्या देशाप्रती आपुलकीची भावना व्यक्त व्हायला हवी. मंदिर, पाणवठे, स्मशानभूमी या ठिकाणी काही भेदभाव शिल्लक राहिला असेल तर तो संपला पाहिजे.
देशात रोजगार वाढला पाहिजे आणि देशाचा पैसा देशातच वापरला गेला पाहिजे. म्हणूनच स्वदेशीच्या आचरणाची सुरवात आपल्या घरापासूनच व्हायला व्हावी.
जगाचं ढासळलेलं संतुलन पुन्हा प्रस्थापित करून सुख व शांतीयुक्त नवजीवनाचे वरदान जगाला देणे हेच वर्तमानकाळात आपल्या अमर भारत राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे प्रयोजन आहे.
रेशिमबाग , नागपूर दि. २४ ऑक्टोबर २०२३
सौजन्य – विश्व संवाद केंद्र