काल आझाद मैदानांवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. २०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? याबाबत महत्त्वाचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याबाबत बोलताना तो दसरा मेळावा नाही,शिमगा आहे. आता तिकडे टोमणे सभा सुरु असेल. दसरा मेळावा शिमग्याला घ्यावा.असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
पवार साहेबांकडे 2 माणसे पाठवली आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या नावाची शिफारस करायला लावली. 2004 पासून यांना मुख्यमंत्री व्हायचं होते मात्र दाखवायचं नव्हतं, एक चेहरा आहे पण त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे दडले आहेत. पोटात एक ओठात एक असं आमचं काम नाही पण मी त्याचा साक्षीदार आहे. शेवटपर्यंत कळू दिलं नाही ना चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही. हीच खरी कमाल आहे मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे संधीसाधू झाले असंही एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले आहेत.
तसेच शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठा आरक्षण देणारच, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला काल दसरा मेळाव्यात दिला आहे.
विकासकामं, हिंदुत्व आणि ५० खोक्यांच्या आरोपांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर आगपाखड केली आहे. आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.