भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती. त्यामुळे आज रवींद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर दोघे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी रवाना झाले.
या बैठकीत निलेश राणेंच्या नाराजीचे कारण अखेर समोर आले असून यावर बैठकीत तोडगा काढून पुढील काळात कोकणात निलेश राणेंच्या नेतृत्वात भाजपचा झंझावात सुरू राहणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्या न जाणून घेतल्याने निलेश राणे नाराज होते. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना नेते जाणून घेत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, असे रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले तसेच एक चांगला कार्यकर्ता पक्षाच्या कामातून बाहेर जाणे पक्ष संघटनेला परवडणारे नाही असेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.