प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या गावागावात त्यांचं किर्तन ऐकलं जात होतं,ज्येष्ठ कीर्तनकार अशी त्यांची जगभरात प्रचिती होती. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेची सव्वाशे वर्षांची परंपरा जपली होती.
बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या (शुक्रवारी)२७ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.
ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.