त्या दिवशी तो छोटा मुलगा विठूरायासाठी नैवेद्य घेऊन आला होता..
निरागस पण निश्र्चयी मुद्रा, डोळ्यात अपार भक्ती आणि आपल्या श्रध्येय माऊलीवर असणारा अपरंपार विश्वास !!!
त्याने नैवेद्य दाखवला आणि…आणि .. विठूरायाच्या जेवणाची वाट की हो बघत बसला…
घटका गेली, प्रहर गेले पण माऊलीला जेऊ घालण्याचा याचा बालहट्ट तसूभरही ढळला नाही….
अखेर पांडुरंग त्याच्या भक्तीपुढे शरण आले. त्यांनी नैवेद्य चाखला आणि गाढ श्रद्धा जिंकली….!!
तो बालक म्हणजे अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांना परिचित असणारे संत नामदेव महाराज !
आज पासून बरोबर ७५३ वर्षापूर्वी म्हणजे १२७० साली, भाविक आणि सात्विक स्वभावाच्या दमाशेट्टी आणि गोणाईच्या पोटी त्यांचा जन्म झाला.
पूर्वजांकडून विठ्ठल भक्तीचा वारसा लाभल्यामुळे बालवयातच विठुराया त्यांचा सखा झाला.
जनाबाई ही एक अनाथ मुलगी नामदेवांच्या घरीच लहानाची मोठी झाली. नामदेवांच्या साथीने तिला सुद्धा निःसीम भक्तीचा मार्ग सुकर झाला. जनाबाईंनी बरेच अभंगही लिहिले आहेत.त्या प्रत्येक अभंगात ‘म्हणे नामयाची जनी ‘ असा उल्लेख त्या करतात.
पंढरीच्या वाळवंटात ‘ऐक्याचा काला ‘ही प्रथा नामदेवांनी सुरू केली.
हीच ऐक्याची पताका घेऊन त्यांनी भारत भ्रमण केले. विशेषत: पंजाब प्रांतात त्यांनी भक्तीरसाची गंगा पोहोचवून हरी नामाचा गजर केला. त्यांचे काही अभंग ‘ गुरूमुखी ‘मध्येही आहेत
महादेवाच्या मंदिराचे दार ज्यांच्यासाठी फिरले अशी अख्यायिका सांगितली जाते. ते नामदेव महाराज वारकरी सांप्रदायाचे आद्य कीर्तनकार होते.
त्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग येऊन नर्तन करीत असे अशी श्रध्दा आहे.
‘माझी समाधी म्हणजे विठ्ठल मंदिराची पायरी असावी. जेणे करून विठूरायाकडे येणाऱ्या प्रत्येकाची चरणधूळ मला लागेल ‘ अशी त्यांची अंतिम इच्छा होती
त्या प्रमाणे आजही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराची पहिली पायरी ‘नामदेव पायरी ‘आहे. प्रत्येक वारकरी आजही त्या पायरीचे दर्शन घेतो
आज नामदेव महाराजांच्या जन्मदिनी त्यांना नमन करतांना त्यांच्याच शब्दात इतकेच म्हणावे वाटते
नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी
डॉ. माधुरी भास्कर कुलकर्णी, राहुरी
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र