दिल्लीमध्ये आजपासून इंडिया मोबाईल काँग्रेस परिषदेला सुरवात झाली, त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यासोबतच पीएम मोदींनी देशभरातील 100 5G प्रयोगशाळांचं देखील उद्घाटन केले .
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की “टेक्नोलॉजीमध्ये आज दररोज वेगाने बदल होत आहे. टेलिकॉम, टेक्नॉलॉजी, कनेक्टिव्हिटी, एआय, सायबर सिक्युरिटी, सेमिकंडक्टर, 6G, ड्रोन, डीप सी किंवा स्पेस, ग्रीन टेक किंवा अन्य कोणतेही सेक्टर्स असो.. येणारा काळ हा अगदी वेगळाच असणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, भारतात वेगाने 5G चा विस्तार होत आहे.आमच्या सरकारच्या काळात 4G चा विस्तार झाला, मात्र आमच्यावर एकही डाग लागला नाही. 6G क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल असा मला विश्वास आहे.”
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी यूपीए सरकारच्या काळात झालेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, की 2Gच्या वेळी जे झाले ते सर्वांनाच माहिती आहे. मात्र, मी त्याबाबत आता बोलणार नाही.
भारतात होत असलेल्या स्मार्टफोन उत्पादनाबाबत पीएम मोदी म्हणाले की, गुगल त्यांचे पिक्सेल उपकरण भारतात तयार करेल. Samsung Galaxy Z Fold5 आणि iPhone 15 आधीच भारतात तयार केले जात आहेत. आता लवकरच संपूर्ण जग ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात करतील.