‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा राज्यस्तरीय सोहळा
सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र सरकार आणि राज्य शासन काम करीत आहे, यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. पायाभूत सुविधा, इमारती, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधा याबरोबरच आपल्या मातृभूमीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळेच ‘माझी माती माझा देश अभियान’ हे देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान राबविण्यात येत आहे. ऑगस्ट क्रांती मैदान येथे या अभियानांतर्गत ‘अमृत कलश यात्रा’ राज्यस्तरीय सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार रमेश पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, नेहरू युवा केंद्राचे राज्य समन्वयक राजेंद्र मालुरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ऑगस्ट क्रांती मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. ‘भारत छोडो’ चा नारा येथून देशभर गेला. ९ ऑगस्ट रोजी ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सुरुवात याच मैदानातून केली. राष्ट्रभक्ती, देशभक्ती वाढीस लावणारा ‘माझी माती माझा देश’ कार्यक्रम आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन राज्य शासन काम करीत आहोत. परकीय गुंतवणूक, पायाभूत सुविधा यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत असताना त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपले राज्य हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
गावागावांतून एकत्र केलेली माती या अमृतकलशांच्या माध्यमातून आज मुंबई येथे आणण्यात आली आहे. या अमृत कलशांचे स्वागत करुन सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. अमृत कलश नवी दिल्लीत अमृत वाटिकेत नेले जातील. देशभरातून आणलेली माती या ठिकाणी एकत्रित केली जाईल. खऱ्या अर्थाने एकात्मतेचं दर्शन येथे होईल. सांस्कृतिक कार्य विभागाने उत्तम नियोजन केले असून या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे याबाबत निश्चितच कौतुक आहे. याशिवाय, नागरी क्षेत्रात मुंबई महानगरपालिका आणि इतर नागरी संस्थांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.
आपण शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्षे साजरे केले. लवकरच शिवकालीन वाघनखे आपण राज्यात आणत आहोत. संस्कृती, परंपरा जोपासण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत कलश शहिदांनी, शूर वीरांनी आपल्या हाती दिला. हा कलश सुराज्याचा करायचा आहे. आपल्या राज्याप्रती, देशाप्रती प्रत्येकाने योगदान देण्याची ही वेळ आहे. सामान्यांचे हीत जपून काम करणारे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी मनोगत व्यक्त केले. अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली.
प्रास्ताविक श्री. खारगे यांनी केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचे स्मरण आपण करत आहोत. सर्व गावे आणि शहरात आपण विविध उपक्रम राबविले. आपले राज्य देशात आघाडीवर आहे.अमृत कलश यात्रेसाठी राज्यातून ४१४ कलश आणि त्यासोबत जवळपास ९०० स्वयंसेवक दिल्ली येथे जात आहेत. त्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भैरी भवानी परफॉर्मिग ग्रुपने देशभक्तीपर विविध गीत-नृत्याचे कार्यक्रम सादर केले. आभार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांनी मानले.