एर्नाकुलम: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक रंगा हरी यांचे रविवारी सकाळी केरळच्या कोची येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही काळापासून वैद्यकीय उपचार सुरू होते. रंगा हरी यांनी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून अनेक वर्ष कामकाज पाहिले होते. त्यांनी १९५१ पासून आपल्या प्रचारक कार्यकाळास सुरुवात केली. त्यानंतर संघातील विविध दायित्वांचे निर्वहन त्यांनी केले. वयाच्या ७५व्या वर्षापासून त्यांनी कोणतेही दायित्व घेतले नसले तरीही ते संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीतील निमंत्रित सदस्य म्हणून सक्रीय होते.
त्यांच्या जाण्याने संघाच्या थिंक टॅंकची हानी झाल्याची चर्चा आहे. संकल्पनेतील स्पष्टता हे रंगी हरी यांच्या कामातील एक प्रमुख वैशिष्ट्य होते. त्यांनी देशभर प्रवास करून लाखो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. गेल्या काही काळापासून ते विविध आजारांनी त्रस्त होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. रंगा हरी यांना समाजातील विविध स्तरांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे जाणे ही एक कधीही भरून न येणारी पोकळी असल्याचे त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करताना म्हटले आहे.