मा. रंगा हरिजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
▪️1983 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये दिनांक पाच ते दहा संघाची अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक स्वयंवर मंगल कार्यालय पुणे येथे होती. तेव्हा मी पूर्ण वेळ व्यवस्थेमध्ये होतो आणि माझ्याकडे प्रामुख्याने सर्व प्रांत प्रचारक यांची व्यवस्था बघण्याचे काम होते. तेव्हा माझी केरळ प्रांत प्रचारक श्री. रंगा हरीजींची पहिली भेट झाली आणि त्यांच्या विनोदी आणि आपुलकीच्या व्यवहारातून मनावर एक छाप पडली होती. नंतर अनेक वर्ष संघ शिक्षा वर्गामध्ये आणि विज्ञान भारतीच्या कामामुळे बरेचदा त्यांचे विचार ऐकायला व मार्गदर्शन मिळाले.
▪️ते बौद्धिक प्रमुख असताना कार्यकर्त्यांची सीपी किती त्यावर कार्यकर्ता किती स्तराचा काम करतो आणि किती काम करतो हे ठरते असे सांगितले आणि त्याप्रमाणे स्वतःच्या कार्याची मोजदाद करण्याची सवय लागली. सीपी म्हणजे कॉन्टॅक्ट पावर ज्या कार्यकर्त्याची एक महिन्यांमध्ये शंभर स्वयंसेवकांची संपर्क करण्याची क्षमता आहे याचा अर्थ कार्यकर्त्याची सीपी 100 आहे असे सांगून एक महिन्यात आपण किती संपर्क ठेवतो यावर सीपी अवलंबून आहे असे सांगून एक नवीन संघ कार्याचा आयाम उलगडून दाखवला होता.
▪️विज्ञान भारतीचे काम करत असताना वैचारिक क्षेत्रात काम करणे कसे अवघड असते आणि जन सामान्य संघटनेमध्ये काम करणे त्यामानाने सोपे असते असे समजत वैचारिक क्षेत्रात काम करताना घ्यावयाच्या काळजी आणि आव्हाने याच्यावर उपाय कसा करायचा याचे मार्गदर्शन श्रीमद् भगवद्गीतेच्या अनुषंगाने सांगितले होते. रंगाहरीजी यांचा भगवद्गीतेचा अभ्यास प्रचंड होता. बऱ्याचदा गुरुजी जन्मशताब्दी निमित्त समग्र गुरुजी वांग्मय लेखनासाठी त्यांचा मुक्काम मोतीबागेत असे. त्यावेळी त्यांची भेट म्हणजे मेजवानीच असे आणि शिदोरी काही ना काही तरी बरोबर मिळत असे. ते बौद्धिक समजून घेणे हाच पुढील मार्गक्रमण करताना उपयोगी असणारा ठेवा असे.
▪️आठवणी असंख्य आहेत अशा महान संत संतपुरूषास त्रिवार वंदन. त्यांच्यापुढे स्वाभाविकपणे नतमस्तकच होत असे. संघाच्या बौद्धिक विकासामधील त्यांचे योगदान खूप वरच्या स्तराचे आहे. त्यांचे जाणे ही सर्वांसाठीच दुःखाची बाब आहे. मात्र ईश्वरेच्छा बलियसि या नैसर्गिक न्यायाने त्यांचे दुःखद निधन, मला खात्री आहे की ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देईल आणि शांतीप्रदान करेल. ऋषी तुल्य रंगाहरिजींना भावपूर्ण श्रद्धांजली ! ..
▪️काशीनाथ देवधर▪️
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे