दोन महिन्यापूर्वी २३ ऑगस्टला आपण सगळ्यांनी एक थरार अनुभवला…
सगळ्यांचे श्वास रोखले गेले..
मागच्या कटू आठवणी उगाच मनात पुन्हा पुन्हा पिंगा घालत होत्या…
पण सगळे अडथळे यशस्वीपणे पार करत आपलं चंद्रयान अलगद चंद्रावर उतरल…..
भारताच्या अवकाश विज्ञानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुला खोवला गेला…
हा कळसाध्याय याची देही याची डोळा बघताना या विज्ञान मंदिराची उभारणी नक्की कोणी केली ? हा विचार मनात आला
आणि दोन नावं ठळकपणे पुढे आली
एक विक्रम साराभाई आणि
साराभाइंनी ज्यांचा वारसा पुढे नेला ते होमी जहांगीर भाभा !
भारताने बैलगाडी युगातून बाहेर येऊन अणू युगात प्रवेश केला याचे श्रेय तर होमी भाभाना जातेच पण या अणूपुरुषाने अणूला विनाशाच्या मार्गावरून दूर करून निर्माणाच्या मार्गावर आणून उभे केले हे अधिक महत्त्वाचे !
अणूशक्तीच्या क्षेत्रात त्यांनी नवीन मार्ग उघडले त्यांच्यामुळे न्यूक्लिअर भौतिकीला सन्मानाचे स्थान मिळाले.
“दोन दशकानंतर जेव्हा अणुशक्तीच्या मदतीने विद्युत शक्ती प्राप्त करून तिचा उपयोग केला जाईल तेव्हा भारताला त्याविषयीचे विशेषज्ञान विदेशात शोधण्याची गरज पडणार नाही ते भारतातच उपलब्ध होईल”
हे त्यांचे त्यावेळचे शब्द भविष्यातील भारताच्या उज्वल यशाची नांदी ठरले.
त्यांच्या प्रयत्नातून १९४५ मध्ये ‘ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ‘ ची स्थापना झाली.
राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून अणुशक्ती विकास आणि उपयोग हे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे ते जाणून होते.
त्यांच्याच प्रेरणेने अणुशक्ती आयोगाची स्थापना झाली.
डॉ.होमी भाभा त्या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते
परमाणु शोधासाठी आवश्यक धातूंचा भारतात शोध,
औष्णिक रिअक्टर निर्माण करणे, औष्णिक तत्वांचे शुद्धीकरण शोध आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे काम या आयोगाकडे होते.
अणुशक्ती अध्ययन क्षेत्रात आता भारताने खूप प्रगती केली आहे होमी भाभानी खूप प्रयत्नाने देशाचा वैज्ञानिक विस्तार केला. त्यांनी स्वदेशी साधनांच्या वापरावर भर दिला त्यामुळे परमाणु विज्ञानाच्या क्षेत्रात भारत स्वावलंबी होऊ शकला.
कुशाग्र बुद्धी, कार्य करण्याची अपरिमीत शक्ती, संघटन कौशल्य, वैज्ञानिक दृष्टी, कुशल प्रशासक असलेले होमी भाभा हे एक चांगले संगीतज्ञ कुशल कलाकार आणि प्रसिद्ध लेखकही होते परंतु त्यांनी विज्ञानालाच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट निवडले होते
आज भारताची अवकाश झेप बघून त्यांच्या आत्म्याला नक्कीच आनंद झाला असेल.
आज त्यांच्या जन्मदिनी या वैज्ञानिक क्रांतिकारकास शत शत प्रणाम
सारिका ढोकणे,राहुरी
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र