मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अनावरण होणार आहे . भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत.
वानखेडेवर भव्यदिव्य आणि अविस्मरणीय असा पुतळा अनावरणाचा सोहळा आज रंगणार आहे. सचिनच्या उपस्थितीतच त्याच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी 14 फुटांचा ब्राँझपासून बनवलेला सचिनचा हा पुतळा तयार केला आहे. या अनावरण कार्यक्रमाला राजकीय नेत्यांसह क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूही उपस्थित राहणार आहेत. नवीन खेळाडूंना या पुतळ्याकडे पाहून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियन दिग्गज दिवंगत फिरकीपट्टू शेन वॉर्नच्या चेंडूवर षटकार मारणारा सचिन तेंडुलकरचा हा पुतळा यानंतर सर्वाना पाहण्यासाठी खुला राहणार आहे.