देशाच्या प्रत्येक गावातून आणलेल्या मातीच्या सुगंधाने कर्तव्य पथ दरवळला
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा देश‘ या मोहिमेत सुमारे सहा लाख गावांमधून अमृत कलशामध्ये आणलेली माती विशाल अमृत कलशात (भारत कलश) संग्रहित करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशी वनस्पतीं अमृत वाटिकेमध्ये समारंभपूर्वक आज स्थापित करण्यात आली.
राजधानीतील कर्तव्य पथ येथे सांगता समारंभ सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सांस्कृतिक कार्यमंत्री जी.किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल व मीनाक्षी लेखी, केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, युवा व क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक उपस्थित होते.
विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून अमृत कलश घेऊन आलेल्या लोकांमध्ये मोठा उत्साह होता, तर संपूर्ण कर्तव्य पथही देशभरातून येणाऱ्या मातीच्या सुगंधाने यावेळी दरवळून गेला होता.
या समारोप सोहळ्यासाठी राजधानीत सहभागी होण्याकरिता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रोजी अमृत कलश यात्रा विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून, राज्यातून 414 कलश घेऊन जाणा-या 881 स्वयंसेवकांना रवाना केले होते. शनिवारी दिल्लीत दाखल झालेल्या विशेष रेल्वेतून आगमन झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार व दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने स्वागत व सत्कार केला. यावेळी दिल्लीस्थित मराठी बांधव उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आज कर्तव्य पथावर ठेवण्यात आलेल्या भारत कलशला नमन केले. येथे बांधण्यात आलेल्या मुख्य अमृत वाटिकेचे उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात ‘मेरी माती मेरा देश’ या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रमात देशभरात एकतेचा संदेशही देण्यात आला. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून अमृत कलशात माती घेऊन येणाऱ्या लोकांनी कर्तव्य पथावर देशाच्या माती आणि स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या वीरांना यावेळी आदरांजली वाहिली.
Tags: NULL