मंजुळाबाईंनी वरखेडच्या आडकुजी महाराजांच्या पायावर लहानग्या माणिकला घातले.महाराजांनी प्रसाद म्हणून एक भाकरीचा तुकडा दिला,माणिक बालसुलभ स्वभावानुसार तो चोखू लागला.ते पाहून महाराजांनी त्याचे नाव तुकड्या ठेवले आणि तेच प्रचलित झाले.पुढे तोच तुकड्या “तुकडोजी महाराज”झाला. ३० एप्रील १९०९ वारा प्रचंड वेगाने सों सों आवाज करत वहात होता,झाडे पडू लागली,पत्रे उडू लागले आणि त्याच वेळी मंजूळेला प्रसूती वेदना सुरु झाल्या.बाळ जन्माला आले आणि घरावरचे पत्रे उडून गेले.
आधीच विक्षिप्त आणि तापट असलेल्या बंडूजींनी तान्ह्या मुलासह मंजूळेला घराबाहेर काढले.त्या परिस्थितीत ती शेजारी आसऱ्याला गेली. वडीलांना मुलगा अपशकुनी वाटला पण आईने मात्र बाळाचे नाव माणिक ठेवले.प्रत्येक आईला आपले बाळ माणिकच वाटते.
माणिकचे बालपण मात्र भटकण्यातच गेले.विक्षिप्तपणामुळे वडील कुठे स्थिरावू शकत नव्हते.वरखेड, अमरावती, चांदूरबाजार,यावली वगैरे.रामटेक आणि ताडोबाच्या जंगलात पण रहाण्याची वेळ आली.पुढे त्यांनी मोझरीला आपले केंद्र केले.पण पायाला भवरा लागल्यागत सतत तुकडोजी महाराज प्रवास करीत होते. ज्या ठिकाणी विविध नाती आई,आजी,मावशी वगैरे पाठीवरून प्रेमळ हात फिरवतात,वडीलांचा भक्कम पाठींबा असतो,नाती घट्ट करायला प्रेम आणि त्यागाचे सिंचन असते, एकमेकांना आनंदित ठेवण्याची चढाओढ असते ते म्हणजे घर.पण असे घर तुकडोजींना मिळालेच नाही.प्रेमळ असून सतत मार खाणारी आई सतत शिव्या देणारा,मारणारा,ओरडणारा निर्दयी बाप. कसेबसे चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले तुकडोजी यावलीत रहात असतांना हनोती बुवा नावाचे संत आले होते.ते खूप चांगली खंजिरी वाजवित.माणिक(तुकड्या)त्यांची सेवा करीत असे.त्यांच्या खंजिरीने त्याला वेड लावले होते.एकदा बुवा बाहेर गेले असता माणिकने हुबेहूब त्यांच्या सारखीच खंजिरी वाजवली.एरवी बुवा त्यांच्या खंजिरीला हात लावू देत नसत.मग काय माठाचा काठ घेतला त्यावर कागद चिटकवला झाली खंजिरी तयार.अशी खंजिरी माणिक वाजवू लागला.पण ही खंजिरी टिकाऊ नसल्याने अनेक खंजिऱ्या वाजवून फोडून झाल्या.
एकदा गावात एक खंजिरीवाला आला, झाले माणिक त्याच्या मागे मागे फिरु लागला .शेवटी त्या खंजिरीवाल्याने विचारले काय हवे? माणिक म्हणाला मला खंजिरी पाहिजे पण माझ्या जवळ पैसे नाहीत.माणिकच्या निरागसपणाची किव येऊन तो म्हणाला पैसे नाहीत तर भाकरी आण मी तुला खंजिरी देतो.माणिक धावत घरी आला आणि घरातील १५भाकरींची पूर्ण चळत खंजिरीवाल्याला दिली.खंजिरीवाला खूष झाला त्यानी एक छानशी खंजिरी माणिकला दिली.माणिक आनंदाने घरी निघाला,वाटेतल्या देवळात खंजिरी वाजवून छानसे भजन म्हंटले.वडीलांना खंजिरी दिसू नये म्हणून मित्राकडे ठेवली आणि घरी आला. बघतो तर काय वडील आईला पिशे पिशे करत शिव्या घालत होते कारण ते जेवायला बसल्यावर आई झाकण उघडून बघते तर काय एकही भाकरी नाही.वडील चिडून मारत होते ती बिचारी मी केल्या होत्या कुठे गेल्या माहिती नाही म्हणत होती.माणिक मधे पडला त्याने घडलेले खरे सांगून टाकले.आता आईचे मार खाणे थांबून माणिक मार खाऊ लागला. आई मधे पडली तर दोघांनाही घराबाहेर काढले.शेवटी मायलेक मंजूळेच्या भावाकडे वरखेड ला आले.
घरात सुखशांती नसल्याने आणि शाळेत शिक्षकांच्या अनियमिततेमुळे शिकण्यासारखे काही मिळत नव्हते.त्यामुळे हुशार एकपाठी असूनही माणिक शाळेत न रमता मठ, मंदिर, आश्रमात रमू लागला.तिथे झाडलोट करणे, पाणी भरणे, महाराजांची सेवा करणे अशी कामे करु लागला.तिथे भाकर तुकडा, प्रसाद मिळत असे तेच खाऊन पोट भरत असल्याने तो चार चार दिवस घरी जात नसे.अडकूजी महाराजांनीच माणिकचे नाव तुकड्या ठेवले होते. एकदा माणिक त्यांना संत तुकारामांची भजने गाउन दाखवत होता त्यात शेवटी तुका म्हणे असे असायचे महाराज म्हणाले आता तुका ऐवजी तुकड्या म्हण आणि काय त्यातून लगेच स्फूर्ती घेऊन माणिक ला काव्य स्फुरायला लागले.
“घे करुणा गा,घे करुणा रुक्मिणीरमणा”ही त्यांची पहिली कविता वयाच्या दहाव्या वर्षी लिहिलेली.त्यानंतर समाजप्रबोधनाची अनेक गीते ज्यात “मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव”,राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली,ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या “या सारख्या गीतांतुनच त्यांनी जनजागृती केली. त्यांच्या आडकूजी गुरुंचे निधनानंतर दुःखात ते पंढरपूर ला गेले तिथे विठ्ठलाचे पाय धरुन रडायला लागले, फाटके कपडे,मलीन देह बघून लोकांनी बाहेर काढले, नामदेवाच्या पायरीवर बसून ते भजन म्हणू लागले, ऐकायला गर्दी झाली, लोकांनी समोर पैसे टाकले…जरा वेळाने हे उठून चालायला लागले, लोकांनी पैसे घेऊन जा म्हंटले तर म्हणाले माझ्या सदऱ्याला खिसेच नाहीत.इतके ते नि:संग होते.गावोगावी भजने, व्याख्याने देऊन समाज प्रबोधन करीत त्यातून लोकांनी घेतलेला बोध…
*एक म्हणाला महाराजांनी सांगितले व्यसनं सोडा मी बिडी सोडली.
*एकाने घरी गाय पाळायला सुरुवात केली आणि गाईंना कसायाकडे जाऊ न देण्याचा संकल्प केला.
*महाराजांनी सांगितले बाईला देवीसारखे वागवा मी बायकोला आता मारणार नाही.
*मी अनाथांची, गरीबांची मदत, सेवा करीन.
*सुनेच्या छळणारी सासु भजन ऐकतांना रडायला लागली सुनेला न छळण्याची शपथ घेतली.
*तरुणांनी उद्धटपणा सोडून घरच्या मोठ्यांची सेवा करायला सुरुवात केली.
*तरुण मारुतीच्या मंदिरात जमून व्यायाम दंडबैठका लाठ्या काठ्या फिरवू लागले.
*गावं स्वच्छ दिसायला लागली.
१५ ऑगस्ट १९४७ ला देश धर्मावर आधारित विभाजित स्वतंत्र झाला.लाखो हिंदुंच्या रक्ताचे पाट वाहिले.नेसत्या वस्त्रानिशी हिंदुंना पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले.तुकडोजींना दुःख झाले ते लोकांना सांगू लागले “धर्म नही कहता किसीकी बहूबेटीपर निगा करो, धर्म नही कहता है कोई जीवोंपर हथियार धरो ।
परंतु आपण तर वर्तमानात याचा अनुभव घेतो आहोत.
तुकडोजींचे हिंदुत्वावर प्रेम होते, प्रभू श्रीरामांवर श्रध्दा होती.त्यांच्याकडे संघटन कौशल्य पण होते.त्यांनी भारताचे संरक्षणमंत्री श्री.यशवंतराव चव्हाणांबरोबर सिमेवर प्रवास करुन आपल्या गीत आणि भजनांमधून सैनिकांचे मनोबल वाढविले होते.अशा या संत महात्म्याचे अश्विन कृष्ण पंचमी ला कर्करोगाने दुःखद निधन झाले.परंतु ते त्यांच्या गीतांमधून कार्यातून अमर झाले.
(संदर्भ…. राष्ट्र संत तुकडोजी महाराज (भारत भारती प्रकाशन)
– सौ.वसुधा खटी , येरवडा
सौजन्य – समिती संवाद , पश्चिम महाराष्ट्र