आज वानखेडे स्टेडियम वर चालू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेमधल्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता.
सुरवातीच्या काही धावांमध्येच कर्णधार रोहित शर्माची विकेट मधुशांकाने घेत भारताला पहिला धक्का दिला. मात्र विराट कोहली आणि शुभमन गिलने शांतपणे खेळत डाव सावरला . या दरम्यान विराटने आपले या विश्वचषकातले चौथे अर्धशतक ठोकले तसेच शुभमन गिलने 55 चेंडूत अर्धशतक ठोकले.त्यानंतर या दोघांनी लंकेला धावा काढत पुरते नमवले मात्र या दोघांचाही शतकाचा विक्रम थोडक्यात हुकला. गिल आणि विराट लागोपाठ बाद झाल्यानंतर अय्यर-राहुलने डाव सावरला.आणि भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्यास योगदान दिले.
सूर्यकुमार यादव आणि राहुल हे फिनिशिंगची जबाबदारी असणारे दोन्ही फलंदाज लगेच तंबूत परतले. केएल राहुल याने 19 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 21 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादव याने 9 चेंडूत दोन चैकाराच्या मदतीने 12 धावा जोडल्या.
श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी या सामन्यात बघायला मिळाली.डावाच्या शेवटी भारताच्या खेळाडूंची विकेट गेली असली तरी दमदार खेळी करत मात्र मोठ्या धावसंख्येचे आव्हान त्यांनी श्रीलंकेपुढे आता उभे केले आहे.