मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर विस्कळीत झालेली एसटी बस सेवा आता पूर्ववत झाली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्याचा वेळ देत आंदोलन स्थगित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून एसटी बससेवा सुरू झाली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा देखील पूर्ववत झाली आहे. तसेच जालना येथील इंटरनेट सेवाही मध्यरात्रीपासून पूर्ववत झाली आहे.
त्यामुळे सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, इंटरनेट सेवा बंद असल्याने खंडित झालेले व्यवहार देखील पुन्हा एकदा सुरू झाले आहे.
मराठा आरक्षण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या होत्या . त्यामुळे बीडसह धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती. यासोबतच संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच एसटी सेवा देखील थांबवण्यात आली होती. ज्यामध्ये एस टी चे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. तर प्रवाशांचीही गैरसोय होत होती.