महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदावरुन आदेश बांदेकरांना बाजूला करत आता शिंदे गटाच्या आमदाराला अध्यक्षपद धुरा देण्यात आली आहे. माहीम विधानसभेचे आमदार सदानंद सरवणकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन राजपत्राद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे.
आदेश बांदेकर यांचा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ २३ जुलै २०२३ रोजी संपुष्टात आला आहे. आता ६ नोव्हेंबर २०२३ पासून पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी सदानंद सरवणकर हे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी असतील असे पत्रकात म्हटले आहे.
शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. .माहिम, दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं काम सदा सरवणकरांनी केले आहे. शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.