छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज २० जागांवर आणि मिझोराममधील मात्र सर्व ४० जागांवरआज मतदान होत आहे.छत्तीसगडमध्ये आज मतदान होत असलेल्या अनेक जागा नक्षलग्रस्त बस्तर विभागातील आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान यशस्वी करण्याची जबाबदारी २५,४२९ निवडणूक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. तसेच, मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमध्ये कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून एकूण ५ हजार ३०४ मतदान केंद्रांपैकी दुर्गम भागातील १५६ मतदान केंद्रात मतपेट्या आणि आवश्यक बाबी या कालच हेलिकॉप्टरने पाठवण्यात आल्या आहेत.
छत्तीसगडमध्ये सर्व २० जागांवर सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात मुख्य लढत असणार आहे. सध्या या २० पैकी १९ जागा काँग्रेसकडे आहेत. जुनी स्थिती कायम ठेवण्याचे काँग्रेससमोर मोठे आव्हान असेल.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील २० विधानसभा मतदारसंघात एकूण २२३ उमेदवार उभे आहेत. ज्यामध्ये १९८ पुरुष आणि २५ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
मिझोराममधील सर्व ४० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनल फ्रंट (एमएनएफ), झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. भाजप २३ जागांवर, आम आदमी पक्षाचे चार उमेदवार रिंगणात आहेत.तर ‘आप’ राज्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. याशिवाय २७ अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवत आहेत.
छत्तीसगडमध्ये आज दुपारी 1 वाजेपर्यंत ४४.५५% आणि मिझोराममध्ये ५२.७३ % मतदान झाले आहे.