महिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळीसाठीचे सजावट साहित्य, फराळ, सेंद्रिय शेतमाल उत्पादनाच्या साहित्यांच्या विविध स्टॉलचे मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उद्घाटन केले.
महिलांना औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास सहकार्य करण्यासाठी राज्य शासन महिला बचत गटांना प्रोत्साहन देत असल्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले. कु. तटकरे यांनी यावेळी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला आणि महिलांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्रालय त्रिमुर्ती प्रांगणात दिवाळी निमित्त महिला व बालविकास विभागातंर्गत ६ ते १० नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील विविध महिला बचतगटांमार्फत बनविण्यात आलेल्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड उपस्थित होत्या.
क्षितीज सीएमआरसी, मुंबई जिल्ह्याचा दिवाळी फराळ, स्वाभिमान प्रोजेक्ट सीएमआरसी, मुंबई जिल्ह्याचा दिवाळी सजावट साहित्य, दीपिका गृह उद्योग, ठाणे जिल्ह्याचा रुरल मार्ट, तनिष्का सीएमआरसी , मुंबई जिल्ह्याचा लोकरीच्या हस्तकला तोरण, लेदर वर्क आणि बुक, घे भरारी सीएमआरसी, मुंबई जिल्ह्याचा ज्वेलरी आणि दिवाळी फराळ, उन्नती बचत गट, मुंबई जिल्ह्याचा चॉकलेट आणि पणत्या, नवतेजस्विनी कला दालन, पुणे जिल्ह्याचा ज्यूट प्रोडक्ट, संकल्प आणि खुशिया सीएमआरसी, चंद्रपूर जिल्ह्याचे कार्पेट व बांबू आर्ट, चेतना सीएमआरसी आणि राणीकाजल सीएमआरसी, नंदुरबार जिल्ह्याचे मिलेट, धूपबत्ती उत्पादने, ओवी शेतकरी उत्पादक कंपनी, जालना जिल्ह्याचे सेंद्रिय शेतमाल उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी मंत्रालयात उपलब्ध आहेत.