बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर बोलत असताना मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. यावेळी बोलताना त्यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त टिप्पणी केली. ज्यामुळे सभागृहात उपस्थित असलेल्या महिला आमदार खाजिल झाल्या, तर पुरुष आमदारांमध्ये कुजबुज सुरू झाली. नितीश कुमार यांच्या विचित्र वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
या वक्तव्यानंतर नितीश कुमार यांच्यावर विरोधक टीका करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यावर जाहीर सभेत टीका केली आहे.त्यांनी नितीश कुमार यांचं नाव न घेता इंडिया आघाडीवर टीका केली आहे.यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, इंडी अलायन्सचे लोक सध्या भारतातले विद्यमान सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार पाडण्याच्या गप्पा मारत आहेत. मात्र त्यांच्यातला एक नेत्याने काल भर विधानसभेत, जिथे माता-भगिनीही उपस्थित होत्या, तिथेच हे घाणेरडे वक्तव्य केले आहे. आणि आया-बहिणींच्या अपमानाबद्दल या युतीमधील लोक एक शब्दही बोलायला तयार नाहीत. यांना लाज वाटली पाहिजे,’ असं म्हणत मोदींनी ‘इंडिया’ आघाडीला लक्ष्य केले आहे.
‘हे देशाचं किती दुर्दैव आहे. किती खाली पडणार तुम्ही. जगभरामध्ये देशाची लाज काढत आहात तुम्ही. जे लोक महिलांबद्दल असा विचार करतात ते तुमचे काय भले करणार?’ असा प्रश्न मोदींनी सभेला उपस्थित मतदारांना विचारला आहे.