महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत हवामानातील असमतोलामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकारकडून त्यांच्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यास सुरुवात झाल्याची महत्त्वाची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त क्षेत्राच्या केलेल्या सर्वेक्षणाचे अंतरिम नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आजपासून विम्याची रक्कम वितरीत करायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे,
खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.