गोवत्स द्वादशी तथा वसूबारस ही अश्विन वद्य द्वादशीला साजरी केली जाते. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून, मुख्य दरवाज्याजवळ दिवे ठेवून दिपोत्सवाची सुरूवात होते. या दिनी स्त्रिया एकभुक्त राहून संध्याकाळी गायीची वासरासहीत मनोभावे पूजा करतात. या दिवशी गहू व मूग यांचे सेवन करत नाहीत, तसेच दूध , दूधाचे पदार्थ , तळलेले पदार्थ वर्जित केले जातात. दिवसा तव्यावर अन्न बनवले जात नाही तर याला पर्याय म्हणून ज्वारी किंवा मक्याच्या कण्या खाल्ल्या जातात. सायंकाळी बाजरीची भाकरी व गवारची भाजीचा मान नैवेद्यासाठी असतो, हे खाऊन उपवासाची सांगता होते.
अमृतासमान असलेले गायीचे दूध व तिचे दुग्धजन्य पदार्थ आपल्यासाठी जणू वरदानच आहे,शरीराला पुष्टी यामुळेच येते व अनेक रोगांवर हे रामबाण औषध आहे. गाय आणी तिचे वात्सल्य, गायीच्या अंगी असलेले देवत्व याप्रती कृतद्णता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच वसूबारस!!
या दिनाविषयीची आख्यायिका अशी आहे की समुद्र मंथनातून ज्या पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्या नंदा,सुनंदा,सुमना,सुरभि व सुशिला या होत. त्यापैकी नंदा या कामधेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. या दिनी श्री कृष्णाची पूजाही काही ठीकाणी केली जाते. गायीच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढे वर्ष स्वर्गलोकीचे वास्तव्य मिळावे आणी गोमातेच्या कृपेने कुटुंबाला आरोग्य संपदा मिळावी ही दृढईच्छा मनी ठेवून हे व्रत आचरले जाते.
कृषीप्रधान भारतीय संस्कृतीमध्ये पशूधन हे श्रेष्ठ मानले जातै, व त्यामध्ये गोधनाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे, याचे प्रत्यक्षप्रमाण म्हणजे आपला परंपरागत सण गोवत्स द्वादशी तथा वसूबारस!
लेखिका – सौ. किर्ती नितीन पाटील.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र