हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पूर्व आणि आग्नेय दिशेने बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे पुढील २४ तासांत गोवा, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
काल म्हणजे शुक्रवारी वातावरणातील घडामोडींमुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात शुक्रवारी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली होती.
काल पुणे शहराच्या सर्वच भागात पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. एरवीच्या तुलनेत अंधारही लवकर पडला. उपनगरांत प्रामुख्याने हडपसर, कात्रज, बिबवेवाडी, आंबेगाव पठार, येरवडा, औंध, पाषाण, बाणेर भागात पावसाचा जोर जास्त होता. ठिकठिकाणी रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत होते.