आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या ११७ धावांची शानदार खेळी आणि मोहम्मद शामीच्या ७ विकेट्सच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला.
खेळाच्या सुरवातीला प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ४ गडी गमावून ३९७ धावांचा डोंगर उभा केला, याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ ३२७ धावाच करू शकला. या विजयासाठी जितकी विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांची चर्चा होत आहे, तितकीच चर्चा मोहम्मद शामीच्या घातक गोलंदाजीचीही होत आहे. न्यूझीलंडची फलंदाजी सुरु झाल्यानंतर एक वेळ अशी आली होती. की टीम इंडियाचे वर्ल्डकप उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहणार का अशी भीती चाहत्यांना वाटायला लागली होती , मात्र शामीने बॉल हातात घेतला आणि न्यूझीलंडवर तुटून पडला. शामीमुळेच टीम इंडियाने सामन्यात पुनरागमन केले आणि फायनलमध्ये थाटात प्रवेश मिळवला.