मध्य प्रदेश विधानसभेच्या सर्व २३० आणि छत्तीसगडच्या दुसऱ्या टप्प्यातल्या ७० जागांसाठी आज मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत, त्यापैकी 20 जागांसाठी पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. . छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ७६.४७ टक्के मतदान झाले आहे.
बुधवारी सायंकाळी दोन्ही राज्यांतील निवडणूक प्रचार थांबला होता. उर्वरित तीन राज्ये राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम सह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही राज्यात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असणार आहे.
मध्य प्रदेशातील ५ कोटी ६० लाखांहून अधिक मतदार २,५३३ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. बालाघाट, मांडला आणि दिंडोरी जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम राजन यांनी सांगितले. तर उर्वरित विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.