श्री रामजन्मभूमी आंदोलनाच्या या अग्रणी योध्द्याला विनम्र अभिवादन !!
‘ते’ दिवसच मंतरलेले होते. ऑक्टोबर १९९० ची कारसेवा. ‘जय श्रीराम’ या पंचाक्षरी मंत्रात या देशाला खडबडून जागं करण्याची किती विलक्षण ताकद आहे याचा अद्भुत प्रत्यय साऱ्या देशाला येत होता. जात, प्रात, भाषा, संप्रदाय, उपासना पद्धती या साऱ्या भेदांवर मात करून एकात्म झालेला हिंदू आपल्या राष्ट्रीय मानबिंदूच्या पुनःप्रतिष्ठेसाठी सज्ज झाला होता. शेकडो वर्षांच्या आघाताने मरगळलेली हिंदू चेतना विलक्षण विजिगीषुतेने एका अभूतपूर्व संघर्षासाठी सिद्ध झाली होती. हा संघर्ष केवळ एका मंदिराचा नव्हता. छद्म धर्मनिरपेक्षतेच्या आत्मघाती आणि राष्ट्रद्रोही विचारधारेला मिळालेले ते आव्हान होते. हा संघर्ष, लढा, राष्ट्राची ओळख निश्चित करणारा लढा होता. हजारो वर्षांपासून या राष्ट्राला एकसूत्रात बांधून ठेवणाच्या राष्ट्रीय मानबिंदूचा, आदर्शाचा अपमान आता सहन करणार नाही या निर्धाराने पेटलेलं हिंदू मानस ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे’ या निर्धाराने अयोध्येकडे डोळे लावून बसले होते.
हजारो कारसेवक देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येकडे निघाले होते. त्याचवेळी ‘यहाँ परिंदा भी पर नहीं मार सकता’ अशी दर्पोक्ती करून ही कारसेवा हाणून पाडण्याची पूर्ण तयारी मुलायमसिंगांच्या सरकारनं केली होती. जणू शत्रूचा निःपात करावयाचा आहे, अशा सूडभावनेने शासन पागल झाले होते. साऱ्या उत्तर प्रदेशाची नाकेबंदी झाली होती. उत्तर प्रदेशातील सामान्य माणूस मात्र कारसेवकांसोबत होता. शेकडो किलोमीटरवरून आलेल्या कारसेवकांचा जत्था लपतछपत पायी प्रवास करीत अयोध्येकडे वाटचाल करताना रामनामाची जादू अनुभवत होता.बव्हंशी कारसेवकांना वाटेतच अटक होत होती. निर्धारित दिवशी अयोध्येत एकही कारसेवक पोहचू नये याचा चंगच प्रशासनाने बांधला होता. मध्यरात्री ठिकठिकाणी बसेस, रेल्वे थांबवून हजारो कारसेवकांना जमेल तिथे डांबून कारागृहात ठेवण्यात आले. त्यावेळी मनावर निराशेची काजळी जमायला लागली. येणारे वृत्त कारसेवा होऊच शकणार नाही, असे होते. सारे मोठे नेते अटकेत होते. कसे होणार? तिथे पोहचलेल्यांचे नेतृत्व कोण करणार?…आणि अचानक आनंदवार्ता धडकली…ठरल्याप्रमाणे कारसेवा झाली!
शतकानुशतकाच्या अपमानाचा प्रतिशोध प्रतीकात्मक का होईना पूर्ण झाला. कोठारी बंधूनी ढांच्यावर भगवा फडकवला! अशोकजी अयोध्येत पोहचले! गंभीर जखमी झाले! कोठारी बंधूंचे बलिदान! एकावर एक वार्ता पसरल्या. हिंदू पौरुषाच्या त्या प्रगटीकरणाने सारे विश्व हादरले. छद्म धर्मनिरपेक्षतेच्या ढांच्याला तडा गेला. पुढे त्याच पुरुषार्थी पराक्रमाने तो उद्ध्वस्तही केला. पण पाशवी सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून प्रचंड प्रतिकूलतेतून मिळवलेला हा विजय काही औरच होता आणि हिंदू चेतनेच्या या लढ्याचे जननायक होते ‘अशोकजी सिंघल!’
अशोकजींचे ‘त्या” दिवशी अचानक अयोध्येत प्रगटणे पुढे अनेक दंतकथांना जन्म देणारं ठरलं. स्वतः अशोक सिंघल यांनी त्यावर कधी भाष्य केले नाही. कारण इतरांसाठी ते आश्चर्य असलं तरी त्यांच्यासाठी ते नव्हतं. “Leading by example” हे व्यवस्थापन शास्त्रात शिकवले जाणारे सूत्र. खरा नेता, योद्धा हा स्वआचरणातून अनुयायांना प्रेरणा देत असतो. संकटावर मात कशी करायची, हे शिकवत असतो. अशोक सिंघल खऱ्या अर्थाने जन्मजात योद्धा होते. ‘त्या’ दिवशी अयोध्येत कोणालाही सुगावा लागू न देता अवतीर्ण होणं हा त्यांच्या अजोड संघटनकौशल्याचा, सूक्ष्म नियोजनाचा, घाडसी नेतृत्वगुणांचा मनोज्ञ परिचय होता आणि इतरांना विस्मित करणाऱ्या आपल्या कौशल्याबद्दल, पराक्रमाबद्दल पुढे कधीही अवाक्षरानेही न बोलणं हा त्यांच्यातील संन्यासी वृत्तीचा पुरावा होता. धर्मरक्षणासाठी, धर्माच्या पुनरुत्थानासाठी योद्धा आणि संन्यासी या दोन्ही भूमिका जगलेले स्वामी विवेकानंदानंतरचे हिंदू संघटक अशोकजी सिंघल हेच होते.
पं. दीनदयाल उपाध्याय संघ प्रचारकांसाठी ‘प्रन्यासी’ असा शब्द वापरीत. समाजात राहूनही संन्यस्त भावनेने आपले संपूर्ण जीवन समाजाला अर्पित करणारी ‘प्रचारक’ परंपरा संघाने निर्माण केली. क्वचित संन्याशाला आपल्या वैराग्याचा, त्या तपस्येचा अहंकार होऊ शकतो, पण ‘प्रन्यासी’ संपूर्ण समर्पणाच्या वाटेवर चालणारा असतो. त्याचं मनंच त्याच्याजवळ नसतं मग मनाच्या आश्रयाने राहणाऱ्या अहंकाराला कसं स्थान असेल? अशी सुंदर व्याख्या पंडितजींनी केली आहे. अशोकजींचं सारं जीवनंच प्रन्यासी जीवन होतं. ‘संघ’ आणि ‘श्रीराम’ या दोन दैवतांना त्यांनी आपलं मन केव्हाच समर्पित केलं होतं. खरं तर अशोकजींचा ओढा लहानपणापासूनच संन्यस्त जीवनाकडे होता.नवव्या वर्गात असताना स्वामी दयानंद सरस्वतींचं चरित्र वाचनात आलं.वाराणसीच्या गंगा किनाऱ्यावर भारतीय आध्यात्मिक शक्तीचे प्रयोग अनुभवाला आले. घरातील धार्मिक वातावरणाने या आध्यात्मिक भावजीवनाला बळ दिले आणि मनःशांतीसाठी गोरखपूर पीठाकडे वाऱ्या सुरू झाल्या. त्याचवेळी बनारस हिंदू विद्यापीठात धातुशास्त्राचे अभियांत्रिकी शिक्षण सुरू होते. तिथेच संघ प्रचारक रज्जूभैयांचा परिसस्पर्श झाला आणि आई-वडिलांच्या अपेक्षा झुगारून कर्मठ, व्रतस्थ प्रचारकी जीवनाला प्रारंभ झाला.तो सारा काळ देश विभाजनाच्या वेदनांनी भरलेला होता. संघबंदी, सत्याग्रह, कारावास या साऱ्या आवर्तात कानपूर येथे प्रचारक असताना अशोकजींचा संबंध रामचंद्र तिवारी यांच्याशी आला. संघप्रचारक म्हणून सामाजिक जीवनातील अनेक अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांची चर्चा ते तिवारींसोबत करीत.
सिद्ध, संतकोटीच्या या महापुरुषाला वैयक्तिक जीवनात अशोक सिंघल यांनी गुरुपदी विराजमान केले. महाभारत, रामायण, चारही वेद, अन्य प्राचीन वाङमयाचा अभ्यास त्यांच्या मार्गदर्शनात झाला. विशेषतः वेदांच्या राष्ट्रधारणा करणा-या अद्भुत सामर्थ्याबद्दलची तीव्र जिज्ञासा अशोक सिंघल यांच्या मनात जागृत झाली. उदयपूरला सोळा दिवस चाललेल्या ब्रह्मयज्ञातून काही विलक्षण अनुभूती त्यांना प्राप्त झाली. त्यातूनच यापुढील जीवन वेदवाङमयाच्या प्रचारासाठी वाहून घ्यावे हा विचार बळावला. संघकार्य की वेदकार्य ? मनात प्रश्नांचे आवर्त फेर धरू लागले.या प्रश्नाच्या उत्तरासाठी अशोकजीनी थेट सरसंघचालक गुरुजींना पत्र लिहिले. हा अशोकजींच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता. अध्यात्माच्या वाटेवर शांतरसाच्या प्राप्तीसाठी निघालेल्या एका संन्याशाचे एका योद्धा जननायकामध्ये रूपांतर करणारा तो क्षण होता.
गुरुजींनी अशोकजींच्या पत्राला उत्तर दिले. मोक्षाची आस लागलेल्या नरेंद्राला ठाकूर रामकृष्ण परमहंसांनी जसे जीवनोद्देशाप्रत आणले, अगदी तसाच प्रभाव श्री गुरुजींच्या शब्दांचा अशोक सिंघल यांच्यावर झाला. “वेदांमध्ये अपार शांतीची, राष्ट्रधारणा करणारी अद्भुत क्षमता आहे हे निर्विवादच. पण त्या मंत्रशक्तीला वाहून नेणारा समाज दुर्बल आहे. या समाजाला आपल्या वास्तविक स्वरूपाची ओळख कोणी करून द्यायची ? कोणी घडवायचा हे सारं धारण करू शकणारा सक्षम,समर्थ,सुबुद्ध समाज ?” श्री गुरुजींच्या या मार्गदर्शनाने जीवनप्रयोजन निश्चित झाले, आणि हिंदू समाजाला संघर्षाचे पाथेय देणारा अलौकिक जननायक लाभला.
मीनाक्षीपुरमला घडलेल्या सामूहिक धर्मांतराचे पडसाद देशभर उमटले होते. त्यातून हिंदू संघटनकार्याचे महत्त्व, त्याचे विविध आयाम हे विषय ऐरणीवर आले. महाराजा कर्णसिंहाच्या नेतृत्वात दिल्लीला झालेल्या विराट हिंदू संमेलनाच्या आयोजनात प्रांत प्रचारक म्हणून अशोक सिंघल यांची मध्यवर्ती भूमिका होती. त्यातूनच पुढे विश्व हिंदू परिषदेची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. त्या पुढचा इतिहास हिंदू चेतनेच्या संघर्षाचा दैदीप्यमान इतिहास आहे. आपल्या तपःपुत व्यक्तित्त्वाने, प्रखर वाणीने, अडिग आत्मविश्वासाने आणि अजोड वज्रनिधाराने अशोक सिंघल यांनी परिषदेच्या कार्यात नवीन प्राण फुंकले. संघटन, संघर्ष, संतसमन्वय आणि सेवा ही विहिपच्या कार्याची चतुःसूत्री बनली. ‘श्रीराम जन्मभूमी आंदोलन’ हा अशोक सिंघल यांच्या जीवनाकार्याचा कळसाध्याय होता. या आंदोलनाची तात्त्विक पृष्ठभूमी तयार करण्यापासून तर देशाच्या कानाकोपऱ्यात या आंदोलनाच्या निमित्ताने सुप्त हिंदू समाज मनाला जागृत करण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांच्या नेतृत्वात झाले. ७ ऑक्टोबर १९८४ रोजी सीतामठी ते अयोध्या बिदाई रथयात्रा त्यांनी काढली. अक्षरश: हजारो महिला बिदाई गीत गात त्यात सामील झाल्या.
राम-सीतेच्या नुसत्या नावात देश ढवळून काढण्याची किती विलक्षण ताकद आहे याचा तो प्रत्यय होता. त्यानंतर शीलापूजन, रामज्योत, कारसेवा असे वेगवेगळ्या अध्यायांनीच हे आंदोलन ढवळून निघाले. यानिमित्ताने हिंदुत्वावर राष्ट्रीय चर्चा सुरू झाली. छद्म धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटणे सुरू झाले. सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि ‘राष्ट्र’ या संकल्पनांची चर्चा सुरू झाली. या सा-या झंझावातात अशोकजी एकीकडे संघटन व संघर्षातून देश जागा करीत होते तर दुसरीकडे देशातील साऱ्या संतांचा समन्वय घडवून आणत होते. हे कार्य फारच मोलाचे होते अन् ऐतिहासिकही !
विहिपची स्थापनाच मुळी एका विशिष्ट पार्श्वभूमीवर झाली होती. हिंदू समाज विविध जाती, पाती, पंथ, संप्रदाय यात विभागलेला. या साऱ्या पंथ संप्रदायांच्या साधुसंतांना, विविध पीठांच्या आचार्यांना एकत्र आणणे आणि धार्मिक आध्यात्मिक आधारावर त्यांच्यामध्ये एकसूत्रता आणणे हे अत्यंत जिकरीचे काम. आपापल्या उपासना पद्धती, कर्मकांड, आचार-विचार यांची अहंता बाळगून आपापल्या मठमंदिरांच्या कोषात अडकलेल्या धर्माचार्यांना एकत्र आणणे अशक्य कोटीत वाटावे, असे होते. पण याच धर्माचार्यांचा विलक्षण प्रभाव सामान्य हिंदू माणसावर होता ही पण वास्तविकता होती. डॉ. आंबेडकरांना धर्मपरिवर्तनापासून परावृत्त होण्याची विनंती करताना दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांना तुमचा आमच्या कामावर, म्हणजे संघाच्या जातपातविरहित एकात्म हिंदू समाज निर्मितीच्या कार्यावर, विश्वास नाही का, असा प्रश्न केला असता संघकार्याच्या सामाजिक समरसतेची यथार्थ जाणीव असणाऱ्या बाबासाहेबांनी प्रतिप्रश्न केला होता. “मुख्य प्रश्न सामान्य हिंदू कोणाचे ऐकतो हा आहे. त्याच्यावर सनातनी धर्मगुरूंचा प्रभाव आहे. तुमच्या कामाची शक्ती वाढेपर्यंत मी कशी वाट बघायची ?” बाबासाहेबांच्या या प्रश्नाचा आशय कटु असला तरी ते यथार्थ वास्तव होते.
हिंदू संघटन कार्यात वाहून घेतलेल्या साऱ्यांनाच अस्वस्थ करणारे होते. याच अस्वस्थतेतून साऱ्या धर्माचार्यांना एकत्र आणणाऱ्या विहिपची स्थापना झाली. “न हिंदू पतितो भवेत् सर्वे हिंदू सहोदरा:” या हिंदू ऐक्यमंत्राचा उद्घोष झाला. गुरुजींच्या अलौकिक प्रभावात हा चमत्कार घडला होता. हे सूत्र पुढे अत्यंत प्रभावीपणे समोर नेऊन या साऱ्या धर्माचार्यांना हिंदुत्वाच्या राष्ट्रीय आणि सामाजिक आशयाशी सक्रियतेने जोडून ठेवण्याचे कार्य तब्बल ३५ वर्षे ज्या कुशलतेने अशोक सिंघल यांनी केले ते केवळ अद्वितीय आहे. आपापल्या संप्रदायाच्या आणि साधनेच्या अभिनिवेशात अडकलेल्या संतमंडळींना एकत्र गुंफणे हे किती जिकरीचे काम ! पण अशोकजीनी ते लीलया केले. राष्ट्र जीवनातील ते त्यांचे महत्तम योगदान आहे. आद्य शंकराचार्य आणि गुरुजी यांच्याशीच केवळ तुलना होऊ शकणारे व त्या परंपरेला पुढे नेणारे आहे.
अशोक सिंघल हे करू शकले, कारण त्यांचे निखळ प्रेममय व्यक्तित्व ! सगळ्या संतांना ते आपले आत्मीय वाटत. ‘शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है या संघसूत्राने अशोक सिंघल यांनी या महनीयांना जोडून ठेवले. स्वतःकडे सदैव कमीपणा घेऊन घडणान्या सर्व कार्याचे श्रेय संतांच्या ओटीत घालण्याची पराकोटीची आत्मविलोपता अशोकजींमधे होती. नागपूरला हृदयविकारासाठी दवाखान्यात भरती असताना सत्य साईबाबांसारख्या विभूतींनी त्यांचे क्षेमकुशल कळण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा, विशेष विमान पाठवून स्वतःकडे त्यांच्या शुश्रूषेचा आग्रह धरावा,हा प्रसंग या सा-या महनीयांवर अशोकजींचा किती प्रभाव होता हे स्पष्ट करणारा आहे. त्यामुळेच सा-याच धर्माचार्यासाठी अशोकजींचा शब्द अंतिम राहात असे.
याच प्रेमबळावर या संतशक्तीला सेवा आणि समरसता या आयामांशी त्यांनी जोडले. रामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास ही देशाच्या इतिहासाला वेगळं वळण देणारी घटना होतीच पण त्याहीपेक्षा तो शिलान्यास कामेश्वर चोपाल नावाच्या कथित निम्न जातीतील रामभक्ताच्या हस्ते करणे ही केवळ युगप्रवर्तक घटना होती. भेदभावरहित एकात्म, बलशाली हिंदुराष्ट्राच्या पायाभरणीचा तो शिलान्यास होता. याच क्रमात त्यांनी साऱ्या धर्माचार्यांचे भोजन डोंब राजाच्या घरी घडवून आणले. विहिंपच्या माध्यमातून आज साठ हजारावर सेवाकार्ये चालतात. ब्राह्मणेतर समाजातील बांधवांना पुरोहित होत यावं, हा आग्रह त्यांनी धरला. त्यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. महिलांनाही पौरोहित्य अधिकार मिळावा यासाठी सदैव आग्रह धरला. आज विहिपच्या ५७ हजार एकल विद्यालयांच्या माध्यमातून लाखो वंचितांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली आहे. ‘गाय’ हा विषय श्रद्धेसोबतच त्याच्या सामाजिक उपयोगीतेच्या दृष्टीने, ग्रामआधारित समाजरचनेच्या दृष्टीने राष्ट्रीय चर्चेत आला आहे. गंगा शुद्धीकरण शासकीय पातळीवर महत्वाचा विषय बनला आहे. आणि लोकसंख्या असंतुलनाच्या संदर्भात घरवापसी हा गंभीर चिंतनबिंदू ठरतो आहे. विहिंपच्या कार्याला हे सारे आयाम अशोक सिंघल यांच्या द्रष्टेपणातून, भविष्यवेधी आकलनातून, पराकोटीच्या परिश्रमातून प्राप्त झाले आहेत.
येणाऱ्या कित्येक पिढ्यांना राष्ट्रसमर्पित जीवनयज्ञाची अनुकरणीय प्रेरणा देऊन अशोकजी पंचतत्वात विलीन झाले. आयुष्याचा शेवटचा क्षण आणि कण राष्ट्रवेदीवरील समिधा म्हणून समर्पित करताना त्यांचे जीवन कृतार्थ झाले. त्यांच्या जाण्याने हिंदुत्वाचा बुलंद आवाज शांत झाला. करोडो हिंदू मनात विजयाची आकांक्षा जागवणारा त्यांचा तो कर्मठ, कणखर आवाज आता पुन्हा ऐकू येणार नाही. पण भारतमातेला शेवटचे वंदन करताना ते नक्कीच म्हणाले असतील,
“जीवन भर का सुवर्ण देकर भी
कहता मन की दें दू कुछ और अभी..!
तन अंगीकार करो, मन स्विकार करो
लोक मोह छोड़कर, प्राण निर्वीकार करो
प्रती पल प्रती आस दू, सुबह दू, शाम दू
जपतप पुनः प्रशमत दे कर भी
कहता मन की दें कुछ और भी.. !
भक्तीभाव अर्चन लो, शक्तीसाज सर्चन लो
अर्पित है अंतर्मन, अहम् का विसर्जन लो
स्वप्न ले लो,जागरण ले लो,
चिरसंचित साधना दे कर भी,
कहता मन की दे दू कुछ और अभी..!”
आशुतोष अडोणी
९३७०३१९७८९
सौजन्य – विश्व संवाद केंद्र, पुणे