कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज पासून पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. या काळात व्हीआयपी,ऑनलाईन दर्शन सेवा बंद ठेवली जाणार आहे.तसेच देवाचे नित्योपचार देखील बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर अहोरात्र उघडे ठेवले जाणार आहे.
या काळात काकडा आरती, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद ठेवण्यात येणार असून या काळात फक्त पहाटे चार ते पाच या वेळात नित्यपूजा, सकाळी पावणे अकरा ते अकरा या वेळात महानैवेद्य आणि रात्री साडे आठ ते नऊ या वेळात गंधाक्षता करण्यात येणार आहे. प्ररंपरेप्रमाणे काल देवाच्या शेजघरातील पलंग काढून देवाच्या पाठीशी लोड तर रुक्मिणीच्या पाठीशी तक्क्या ठेवण्यात आला आहे. .
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीकडून नियोजन करण्यात येत आहे,
आषाढ ते कार्तिक या मराठी चार महिन्याच्या काळात अनेक महाराज पंढरीत मुक्कामी असतात. या चातुर्मासाची समाप्ती कार्तिकी यात्रेला होते. या यात्रेला प्रामुख्याने कोकण,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा तसेच कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. . यंदा ८ ते ९ लाख भाविक येतील असा अंदाज व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.