भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला पार पडणार आहे.रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया सध्या वेगळ्याच फॉर्मात आहे.भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवला आहे तर ऑस्ट्रेलियाने लागोपाठ आठ सामन्यात विजय मिळवला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या अंतिम सामन्यासाठी खास वेगवेगळ्या प्रकारची लाईटिंग केली आहे. प्रेक्षकांना यामुळे आणखी चांगला अनुभव मिळेल. लाईट्ससोबतच संपूर्ण स्टेडियममध्ये ठिक ठिकाणी स्पीकर्सही लावण्यात आली आहे. त्यामुळे गाण्यांसोबतच समालोचनही चाहत्यांना ऐकता येणार आहे.
वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी अनेक मोठे दिग्गज येथे पोहोचणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सामना बघण्यासाठी पोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, फायनल पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज आणि डेप्युटी पीएम रिचर्ड मार्ल्स यांना निमंत्रण पाठवले आहे.
अंतिम सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेची ‘सूर्य किरण एरोबॅटिक टीम’ एक ‘एअर शो’ सादर करणार आहे, ज्याचा थरार चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार आहे.संरक्षण विभागाचे गुजरात जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, सूर्यकिरण एरोबॅटिक संघ मोटेरा परिसरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मॅचच्या आधी १० मिनिटांसाठी आपल्या स्टंटने लोकांना रोमांचित करेल. या एअर शोचा सराव आज आणि उद्या असा दोन दिवस केला जाणार आहे. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममध्ये सामान्यतः ९ विमानांचा समावेश असतो आणि त्यांनी देशभरात अनेक एअर शो केले आहेत.