मुंबईतील प्रत्येक भागात स्वच्छतेचे काम मोहिम स्वरुपात करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा झाली. मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.
मुंबईतील प्रमुख रस्ते, पदपथ, चौक याठिकाणी नियमित स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी अधिकचे मनुष्यबळ देखील लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहर व परिसरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना सुचविल्या आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मोहिम स्वरूपात काम करतानाच प्रत्येक भागात रस्ते, पदपथ, गटारं साफ करण्यासाठी दररोज ५० ते १०० कामगार साफसफाईचे काम करतात अशा ठिकाणी अन्य भागातले कामगार तेथे बोलावून साधारणत: एक हजार कामगारांकडून त्याभागाची साफसफाई करून घ्यावी, अशा प्रकारे मुंबईतील प्रत्येक भागात डिसेंबर महिन्यापासून मोहिम स्वरुपात काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.
सुमारे १०८ स्थानकांच्या माध्यमातून लाखो मुंबईकर उपनगरीय रेल्वेतून दररोज प्रवास करीत असतात. प्रवाशांकडून रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांचा वापर होतो. अशावेळी ही स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी आणि निरंतर त्यांची साफसफाई होत राहील याकरीता मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे निर्देश देतानाच मुख्यमंत्र्यांनी यावेळी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.