राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? याबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटावरती शरद पवार गटाने गंभीर आरोप केले होते. राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्यांची खोटी कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
त्यामुळे अजित पवार गटावर कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली. आज शरद पवार गटाकडून सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना चार तासांचा अवधी दिला गेला आहे. शरद पवार गटाकडून वकील देवदत्त कामत पूर्णवेळ सुनावणी करणार आहेत.
या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. शरद पवारांतर्फे पक्ष संघटना, राष्ट्रवादीच्या घटना आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाची नियुक्ती यावर युक्तीवाद होईल. तर अजित पवार गटाकडून मंत्री धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि रूपाली चाकणकर उपस्थित असतील असे सांगण्यात येत आहे.