राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे.अधिवेशनाला आता काहीच दिवस उरले असल्यामुळे विधानभवन , रविभवन , आमदार निवास या सर्वांची साफसफाई आणि रंगरंगोटी सुरु करण्यात आली आहे.
नागपूरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिस दलानेही कंबर कसली आहे. वाहतूक व्यवस्थेचं नियोजन सुरू असून त्यासाठी सात हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मागच्या अधिवेशन काळात शिवसेनेत फूट पडल्यावर विधिमंडळ परिसरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून वाद झाला होता. आता याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात संघर्ष होतो का? की यावर तोडगा काढला जातो याकडे लक्ष असणार आहे.
या अधिवेशनात मराठा आरक्षण, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुद्दा देखील विरोधक उपस्थित करू शकतात. राज्यातील दुष्काळी स्थिती, पाण्याचा प्रश्न, तसेच नुकसान भरपाईबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची शक्यता आहे.